जळगाव जिल्ह्यात भाजप सेना पायताणावरून आमने सामने - BJP Sena in Confrontation over Opening of Temples | Politics Marathi News - Sarkarnama

जळगाव जिल्ह्यात भाजप सेना पायताणावरून आमने सामने

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 ऑगस्ट 2020

भारतीय जनता पक्षातर्फे काल (ता.२९) संपूर्ण राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथेही भाजपच्या नेत्या खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुक्ताईनगरातील कोथळी येथील संत मुक्ताई मंदिरात घंटानाद आंदोलन केले. आंदोलनावर शिवसेनेने जोरदार टीका केली. भाजप खासदार व पदाधिकारी व कार्यकर्ते पायात चपला घालून थेट सभामंडपात मंदिरात गेले व त्यांनी देवतांचा अपमान केला असा आरोप शिवसेनेने केला आहे

मुक्ताईनगर : जिल्हयात भारतीय जनता पक्ष व शिवसेना मंदिरात पायताणावरून आमने सामने आले आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकाविरूध्द आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत.

भारतीय जनता पक्षातर्फे काल (ता.२९) संपूर्ण राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथेही भाजपच्या नेत्या खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुक्ताईनगरातील कोथळी येथील संत मुक्ताई मंदिरात घंटानाद आंदोलन केले. आंदोलनावर शिवसेनेने जोरदार टीका केली. भाजप खासदार व पदाधिकारी व कार्यकर्ते पायात चपला घालून थेट सभामंडपात मंदिरात गेले व त्यांनी देवतांचा अपमान केला असा आरोप शिवसेनेने केला आहे.

विरोधी शिवसेनेने केलेल्या या आरोपाला भारतीय जनता पक्षानेही तेवढ्याच जोरदारपणे प्रत्यत्तर दिले आहे. खासदार रक्षा खडसे यांनी म्हटले आहे, की आरोप करणाऱ्यांनी आधी संत मुक्ताबाईंचे दर्शन घेऊन वस्तुस्थिती जाणून घ्यावी, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कार्यकाळात संत मुक्ताई मंदिर व आजूबाजूच्या परिसराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणलेला असून, त्या निधीतून मुक्ताई मंदिराचा जीर्णोद्धार व अनेक विकासकामे सुरू आहेत. ज्या ठिकाणी मुक्ताईनगर तालुका भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले ते ठिकाण हे मंदिराच्या बाजूला नियोजित दुकानाची जागा असून, त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. म्हणूनच आरोप करणाऱ्यांनी स्वतः कोथळी येथील संत मुक्ताईचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा आणि स्वतः खात्री करून घ्यावी.-

सरकारला झोपेतून जागे करा
खासदार रक्षा खडसे यांनी राज्य सरकारलाही टोला लगावला आहे. त्या म्हणाल्या, "घंटानाद आंदोलनामुळे आरोप करणाऱ्यांनी आमच्या पायातील चपला, बूट न पाहता राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारने जागतिक कोरोना संकट काळात दारूची दुकाने उघडी केलीत, बाजारपेठा उघड्या केल्यात, बाजारात प्रचंड गर्दी पाहावी आणि भक्तांच्या भावना समजून घेऊन राज्यातील देवस्थाने, मंदिरे सुरू करण्यासाठी कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या सरकारला झोपेतून जागे करावे.''
 Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख