पहिल्या नाही पण दुसऱ्या यादीत गडकरी बनले भाजपचे स्टार प्रचारक - bjp releases new list of star campaigner for bihar assembly election | Politics Marathi News - Sarkarnama

पहिल्या नाही पण दुसऱ्या यादीत गडकरी बनले भाजपचे स्टार प्रचारक

वृत्तसंस्था
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. यावरुन मोठा गदारोळ उडाल्याने पक्षाला अखेर नवी यादी जाहीर करावी लागली आहे.  

नवी दिल्ली : बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपने आज बिहारमधील निवडणुकीसाठी 30 स्टार प्रचारकांची नवी यादी जाहीर केली आहे. आधीच्या यादीवरुन मोठा गदारोळ उडाल्याने ही नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते व बिहार प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होता. आता नव्या यादीत फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही समावेश करण्यात आला आहे. 

भाजपने आज बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 30 स्टार प्रचारकांची नवी यादी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, बी.एल.संतोष, सौदनसिंह, डॉ. संजय जयस्वाल, सुशीलकुमार मोदी, भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, राधामोहनसिंह, रविशंकर प्रसाद, गिरीराजसिंह, स्मृती इराणी, अश्वनीकुमार चौबे, नित्यानंद राय, धर्मेंद्र प्रधान, योगी आदित्यनाथ, रघुवर दास, मनोज तिवारी, नंदकिशोर यादव, राजीव प्रताप रूडी, शाहनवाज हुसेन, मंगल पांडे, शिव नारायण, गोपाल ठाकूर, अजय निशाद, संजय पासवान आणि सम्राट चौधरी यांचा समावेश आहे. 

भाजपने सुरूवातीला जाहीर केलेल्या यादीतून गेली अनेक वर्षे पक्षाचा चेहरा असलेले खासदार राजीव प्रताप रूडी व शाहनवाज हुसेन यांची नावे गायब होती. मूळचे बिहारमधील असलेले आणि राष्ट्रीय स्तरावर छाप पाडणाऱ्या नेत्यांनाच भाजपने डावलल्याने पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. याचबरोबर फडणवीस वगळता महाराष्ट्रातील एकाही नेत्याचे नाव यादीत नव्हते. याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील नेते नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांचाही समावेश नव्हता.

बिहारच्या कोणत्याही निवडणुकीत भाजप प्रचारकांच्या यादी इतर नेत्यांची नावे बदलत मात्र,  रुडी आणि शाहनवाज यांची नावे कायम असत. गेल्या तीन-साडेतीन दशकांत पहिल्यांदाच या दोघांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळली गेली आहेत. रूडी यांनी याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर हा मुद्दा चव्हाट्यावर आला. वाजपेयी-अडवानी काळापासून भाजपबरोबर असलेले रूडी व शाहनवाज सध्या भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. पक्षाने अखेर नवीन यादी जाहीर करीत रूडी आणि शाहनवाज यांच्यासोबत गडकरी यांनाही स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान दिले आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख