भाजपने ममतांवर टाकला प्रशांत किशोर यांचा 'ऑडिओ बॉम्ब' - bjp releases audio chat of election strategist prashant kishor | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपने ममतांवर टाकला प्रशांत किशोर यांचा 'ऑडिओ बॉम्ब'

वृत्तसंस्था
शनिवार, 10 एप्रिल 2021

भाजपच्या आयटी सेलचे अमित मालवीय यांनी प्रशांत किशोर यांची ऑडिओ क्लिप ट्विट केली असून, या ऑडिओ बॉम्बमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
 

नवी दिल्ली :  भाजपच्या आयटी सेलचे अमित मालवीय यांनी प्रशांत किशोर यांची ऑडिओ क्लिप ट्विट केली असून, या ऑडिओ बॉम्बमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे प्रशांत किशोर हे रणनीतीकार आहेत. या क्लिपमध्ये किशोर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करीत असून, त्याचा बंगालच्या निकालावर मोठा परिणाम होईल, असे म्हणत आहेत. 

मालवीय यांनी ही क्लिप ट्विट केली असून, त्यांनी म्हटले आहे की, प्रशांत किशोर यांनीच आता भाजपचा विजय मान्य केला आहे. ममतांचे रणनीतीकार काही पत्रकारांशी बोलताना पराभव मान्य करीत आहेत. जेव्हा ऑडिओ चॅट सर्वांसाठी खुले असल्याचे कळाले तेव्हा मात्र, त्यांनी मौन धारण केले. 

प्रशांत किशोर यांनी या क्लिपमध्ये म्हटले आहे की, तृणमूल काँग्रेसने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणातही भाजपचा विजय होत असल्याचे दिसत आहे. जनतेचे मत हे मोदींसाठी असून, ध्रुवीकरण होत आहे ही वस्तुस्थिती आहे. अनुसूचित जाती (बंगालमधील एकूण लोकसंख्येतील प्रमाण २७ टक्के) आणि मतुआ समाज भाजपला मतदान करीत आहेत. डावे, काँग्रेस आणि ममतांनी मुस्लिमांचे लांगुलचालन केल्याचा फटकाही बसत आहे. 

ममतांच्या रणनीतीकारांच्या या बॉम्बचा वापर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाजपकडून केला जात आहे. भाजपचाच विजय होणार हे दर्शवण्यासाठी भाजप नेते या क्लिपचा वापर करीत आहे. बंगालमध्ये अद्याप विधानसभा निवडणूक संपली नसून, जनमत वळवण्यासाठी भाजपच्या हाती आयते कोलित या क्लिपमुळे मिळाल्याची चर्चा सुरू आहे. 

किशोर यांचा आधीच विजयाचा दावा 
प्रशांत किशोर बंगालच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर एक ट्विट केले होते. यात म्हटले होते की, देशात बंगालमध्ये लोकशाही वाचवण्याची सर्वांत मोठी लढाई लढली जात आहे. बंगालमधील जनता संदेश देण्यासाठी तयार असून, तिने राईट (योग्य) कार्ड दाखवण्याचा निर्धार केला आहे. बंगालला फक्त आपली मुलगी हवी आहे. ता.क. 2 मे रोजी मला तुम्ही माझ्या या ट्विटची आठवण करु द्या. 

पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेस सत्तेत असून, ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहेत. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत तृणमूलला 294 पैकी 211 जागा मिळाल्या होत्या तर, डावे पक्ष व काँग्रेसचे 76 उमेदवार निवडून आले होते. भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी भाजपने सत्तापालट करण्यासाठी जोर लावला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील 42 पैकी 18 जागा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. सध्या तृणमूल विरुध्द भाजप असेच चित्र दिसत आहे, तर डावे पक्ष व काँग्रेसची आघाडीही मैदानात आहे. 

बंगाल विधानसभा निवडणूक कार्यक्रम : 
मतदान :
पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पा 17 एप्रिल, सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिल, आठवा टप्पा  29 एप्रिल 

मतमोजणी : 2 मे 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख