बिहारमध्ये अखेर ठरलं..निवडणूक नितीशकुमारांच्याच नेतृत्वाखाली! - bjp president j p nadda says bihar election will be under leadership of nitish kumar | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारमध्ये अखेर ठरलं..निवडणूक नितीशकुमारांच्याच नेतृत्वाखाली!

वृत्तसंस्था
रविवार, 23 ऑगस्ट 2020

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राज्यातील सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजपने पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. 

पाटणा : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची वारे वाहू लागले आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नसून, सत्ताधारी संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपने एकत्रितपणे निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होईल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज जाहीर केले. याचवेळी लोक जनशक्ती पक्ष आणि जेडीयूमधील कुरबुरी मात्र, सुरूच आहेत. 

बिहार भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीच्या आज  समारोप झाला. या वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नड्डा यांनी पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. नितीशकुमार हेच आघाडीतर्फे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांजवळ कोणतीही दिशा नाही आणि विचारही नाही. जनतेची सेवा करण्याचीही इच्छा त्यांच्याकडे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 

नितीशकुमार यांचा जेडीयू, रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष (लोजप) आणि भाजप हे तिन्ही पक्ष एकत्र येतात, त्यावेळी विजय निश्‍चितच मिळतो. यावेळीही आम्ही एकत्रच निवडणूक लढणार आहोत. यात आम्ही यशस्वीही होऊ, असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला.  

सध्या जेडीयू आणि लोजपमध्ये वाद सुरु आहेत. लोजपचे नेते खासदार चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली आहे. भाजपसोबत जाण्यास तयार आहोत मात्र, नितीशकुमार यांच्याबद्दल आक्षेप आहेत, अशी भूमिकाही त्यांनी घेतली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी नेते चिराग पासवान हे सातत्याने करत आहेत. राज्यातील पूरस्थितीवरूनही चिराग यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे जेडीयूचे नेतेही चिराग यांच्यावर जाहीर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर नड्डा यांनी ही एकीची भाषा केली आहे. 

नड्डा म्हणाले की, आपणा सर्वांना जनतेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश पोहोचवायचा आहे. याचबरोबर नितीशकुमारांनी केलेले कामही जनतेपर्यंत न्यायचे आहे. नितीशकुमार यांच्याच नेतृत्वाखाली पुढील निवडणूक लढणार आहोत. आपल्याला पूर्ण ताकद लावून निवडणूक लढायची आहे. विरोधक खालच्या पातळीवरील राजकारणातून वर येऊ शकत नाहीत. त्यामुळेच जनतेच्या विश्वास आपल्या आघाडीवर आहे. केवळ भाजपच नाही तर, सहकारी पक्षांनाही मजबूत करण्याची जबाबदारी भाजप कार्यकर्त्यांवर आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख