नवीन कार्यकारिणीत पंकजा मुंडेंना स्थान अन् पूनम महाजनांना वगळले - bjp national president j p nadda announced new office bearers of party | Politics Marathi News - Sarkarnama

नवीन कार्यकारिणीत पंकजा मुंडेंना स्थान अन् पूनम महाजनांना वगळले

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

भाजपची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यातून महाराष्ट्रातील काही जणांना डच्चू देण्यात आला असून, काहींना नवीन संधी मिळाली आहे. 

नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी जे.पी.नड्डा यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. वरिष्ठ पातळीवरील काही नावे वगळून नव्या चेहऱ्यांना राष्ट्रीय पातळीवर संधी देण्यात आली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांची राष्ट्रीय सचिवपदी आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

नवीन कार्यकारिणीत नड्डा यांनी तरुण आणि महिलांना अधिक झुकते माप दिले आहे. नड्डा यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांच्या नवीन कार्यकारिणीची प्रतीक्षा होती. अखेर आठ महिन्यांनी ही प्रतीक्षा संपली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी महाराष्ट्रातील एकाही नेत्याला स्थान देण्यात आलेले नाही. कायम चर्चेत असणारे युवा नेते तेजस्वी सूर्या यांना युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याचबरोबर डॉ. रमणसिंह, बैजयंत जय पांडा, अन्नापूर्णा देवी यांनी  राष्ट्रीय उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे.  

महाराष्ट्रातील विनय सहस्रबुद्धे, पूनम महाजन आणि शाम जाजू यांना कार्यकारिणीतून वगळण्यात आले आहे. याचवेळी राष्ट्रीय सचिवपदी महाराष्ट्रातील विनोद तावडे, सुनील देवधर, विजया रहाटकर आणि पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आले आहे. पक्षाच्या सरचिटणीसपदी एनटीआर यांच्या कन्या पुरंदेश्वरी यांना संधी देण्यात आली आहे. याचवेळी राम माधव, मुरलीधर राव आणि अनिल जैन यांच्याकडील सरचिटणीसपद काढून घेण्यात आले आहे. अकाली दलाने भाजपची साथ सोडल्याने पंजाबमधील तरुण चुग यांना सरचिटणीसपदी संधी देण्यात आली आहे. 

 

या नवीन कार्यकारिणीचे भारतीय जनता युवा मोर्चाच्या मावळत्या अध्यक्षा पूनम महाजन यांनी स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळाली पक्षाने दिली याबद्दल मी अतिशय आभारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे जे.पी.नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केले. आता ही जबाबदारी तेजस्वी सूर्या यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या या नवीन प्रवासाला माझ्या शुभेच्छा आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख