भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांचा सरकारला घरचा आहेर

कर्नाटकातील खासदार तेजस्वी सूर्या यांनी राज्यातील भाजपच्या सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांनीराज्य सरकारविरोधात मोहीम उघडल्याने भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
bjp mp tejasvi surya says bengluru is now becoming a terror hub
bjp mp tejasvi surya says bengluru is now becoming a terror hub

बंगळूर : बंगळूर हे दहशतवादी कारवायांचे केंद्रस्थान बनले आहे, असा धक्कादायक आरोप भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी केला आहे. सूर्या यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली असून, त्यानंतर त्यांनी स्वत:च्या पक्षाच्या सरकारला अडचणीत आणणारे पाऊल उचलले आहे. या प्रकरणी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही साकडे घातले आहे. 

सूर्या हे दक्षिण बंगळूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. भाजयुमोच्या अध्यक्षपदी सूर्या यांची नुकतीच निवड करुन त्यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपविली आहे. मात्र, सूर्या यांनी राज्यातील भाजप सरकारविरोधातच मोहीम उघडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी या प्रकरणी अद्याप काहीच न बोलणे पसंत केले आहे. याबद्दल भाजप नेते खासगीत नाराजी व्यक्त करीत आहेत. आपलाच खासदार राज्य सरकारची प्रतिमा मलिन करीत आहे, अशी खंत काही जण व्यक्त करीत आहेत.  

सूर्या यांनी नुकतीच अमित शहा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) सुसज्ज आणि पुरेसे मनुष्यबळ असलेले कार्यालय कर्नाटकमध्ये सुरू करावे, अशी मागणी त्यांनी या भेटीत केली. याविषयी बोलताना सूर्या म्हणाले की, भारतातील सिलिकॉन व्हॅली अशी ओळख असलेल्या बंगळूरमध्ये मागील काही काळात अनेक दहशतवादी कारवाया उघडकीस आल्या आहेत. दहशतवादी गट त्यांच्या कारवायांसाठी बंगळूर शहराचा वापर करीत आहेत. शहरात अनेक स्लीपर सेल तपास यंत्रणांना उध्वस्त केले आहेत. 

गृहमंत्री अमित शहा यांनी लवकरात लवकर एनआयएचे कायमस्वरुपी कार्यालय राज्यात सुरू करण्यात येईल, असे म्हटले आहे. या कार्यालयात पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारी नेमण्याचेही शहा यांनी सांगितले आहे. डी जे हळ्ळी आणि के.जी. हळ्ळी येथील हिंसाचाराच्या  घटनांची चौकशी एनआयएने केली आहे. या तपासात दहशतवादी गट शहराचा वापर कारवायांसाठी करीत असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती सूर्या यांनी दिली. 

काँग्रेस आमदार आर. अखंड श्रीनिवास मूर्ती यांचे घर, त्यांची बहीण जयंती यांचे घर आणि डी जे हळ्ळी व के जी हळ्ळी पोलीस ठाण्यांना जमावाने 11 ऑगस्टला आग लावली होती. सुमारे तीन हजारहून अधिक जणांच्या हिंसक जमावाने ही जाळपोळ केली होती. आमदार मूर्ती यांच्या भाच्याने सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट टाकल्याप्रकरणी हा जमाव हिंसक बनला होता. याला धार्मिक दंगलीचे स्वरुप देण्यात आले होते. यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. आता सूर्या यांनीही याचाच उल्लेख केला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com