धक्कादायक : भाजप खासदाराच्या तीसहून अधिक नव्याकोऱ्या रुग्णवाहिका धूळ खात पडून - bjp mp rajiv pratap rudy ambulances unused and parked in bihar | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : भाजप खासदाराच्या तीसहून अधिक नव्याकोऱ्या रुग्णवाहिका धूळ खात पडून

वृत्तसंस्था
शनिवार, 8 मे 2021

देशातील कोरोना  रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, मृत्यूचे आकडे आता विक्रमी पातळीवर पोचले आहेत.

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Corona) रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, मृत्यूचे आकडे आता विक्रमी पातळीवर पोचले आहेत. रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका  (Ambulance) मिळत नसल्याचे चित्र असताना भाजप (BJP) खासदाराच्या तीसहून अधिक नव्या रुग्णवाहिका धूळ खात पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  

बिहारमधील सारण येथील भाजपचे खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या या रुग्णवाहिका आहेत. त्यांनी खासदार निधीतून खरेदी केलेल्या या रुग्णवाहिका आहेत. रुडी यांच्या मालकीच्या जागेवर या रुग्णवाहिका झाकून ठेवण्यात आलेल्या होत्या. बिहारमध्ये अनेक रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नसल्याचे चित्र आहे. याचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका धूळ खात पडून असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. 

जन अधिकार पार्टीचे अध्यक्ष पप्पू यादव यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. याविषयी बोलताना पप्पू यादव म्हणाले की, राज्यात सर्वाधिक गरज असताना या रुग्णवाहिका का धूळ खात पडल्या आहेत? येथे तब्बल 30 रुग्णवाहिका आहे. येथे एकूण 100 पेक्षा जास्त रुग्णवाहिका होत्या. त्यातील काही नंतर दुसरीकडे हलवण्यात आल्या. त्यांचा वापर का होत नाही याचे उत्तर खासदार रुडी यांनी द्यावे? बिहारच्या जनतेसाठी या रुग्णवाहिका असताना त्या जनतेला नेमक्या वेळी मिळत नाहीत. 

हेही वाचा : दर तासाला कोरोनामुळे देशात 174 तर महाराष्ट्रात 37 जणांचा मृत्यू 

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 18 लाख 92 हजार 676 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 38 हजार 270 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 4 लाख 1 हजार 78 रुग्ण सापडले आहेत.  मागील 24 तासांत 4 हजार 187 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

देशातील राज्यनिहाय 24 तासांतील मृत्यू (एकूण मृत्यू 2,38,270) 
महाराष्ट्र : 898  
कर्नाटक : 592 
उत्तर प्रदेश : 372 
दिल्ली : 341 
छत्तीसगड : 208 
तमिळनाडू : 197 
पंजाब : 165 
राजस्थान : 164 
हरियाना : 162 
उत्तराखंड : 137 
झारखंड : 136 
गुजरात : 119 
पश्चिम बंगाल : 112 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  
2 कोटी : 4 मे 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख