बिहारमध्ये काल मुख्य सचिव अन् आज भाजप आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू - bjp mlc Hari Narayan Choudhary dies of covid19 in bihar | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारमध्ये काल मुख्य सचिव अन् आज भाजप आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 1 मे 2021

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला असून, जगात सर्वाधिक रुग्ण भारतात सापडू लागले आहेत. 

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 4 लाख 1 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 523 जणांचा मृत्यू झाला आहे. भाजपचे आमदार हरिनारायण चौधरी यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. ते 77 वर्षांचे होते. दरम्यान, बिहारचे मुख्य सचिव अरुणकुमारसिंह यांचा कालच (30 एप्रिल) कोरोनामुळे मृत्यू झाला होता. 

चौधरी हे बिहार विधानपरिषदेचे सदस्य होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने मागील आठवड्यात पाटण्यातील इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी चौधरी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बिहारच्या विधान परिषदेचे अध्यक्ष अवधेश नारायण सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे. चौधरी हे मूळेच समस्तीपूर येथील होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि तीन मुली असा परिवार आहे. 

चौधरी यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शोक व्यक्त केला आहे. चौधरी हे जनतेत अतिशय लोकप्रिय होते आणि ते कायम सामाजिक कार्याला प्राधान्य देत होते. समाजातील सर्व घटकांमधून त्यांना मान्यता मिळाली होती. त्यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असे नितीशकुमार यांनी म्हटले आहे. 

देशात 24 तासांत 4 लाख रुग्ण 
देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 11 हजार 853 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 4 लाख 1 हजार 993 रुग्ण सापडले असून, 3 हजार 523 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

सक्रिय रुग्णांची संख्या 32 लाखांवर 
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 32 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 32 लाख 68 हजार 710 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 17.06 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते 81.84 टक्क्यांवर आले आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 56 लाख 84 हजार 406 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.11 टक्के आहे. 

मागील 24 तासांत देशात 3 हजार 523 मृत्यू झाले आहेत. यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातील असून, 828 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ दिल्ली 375, उत्तर प्रदेश 332, छत्तीसगड 269, कर्नाटक 217, गुजरात 173, राजस्थान 155, उत्तराखंड 122, झारखंड 120, पंजाब 113 आणि तमिळनाडूतील 113 मृत्यूंचा समावेश आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख