भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक : नवाब मलिकांचा दावा - BJP MLAs Want to Join NCP Claims Nawab Malik | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक : नवाब मलिकांचा दावा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

सत्ताधारी महाविकास आघाडीचे आमदार फोडून भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार, याची जाण महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही आहे. त्यामुळे नाराज आमदार भाजपच्या गळाला लागू नये, यासाठी महाविकास आघाडीतील तीनही मोठ्या पक्षाचे नेते काळजी घेत आहेत. 

मुंबई : राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपात जाणार अशी अफवा विरोधक पसरवत असून ही खोटी व निव्वळ अफवा आहे. विशेष म्हणजे भाजपाचे आमदारच राष्ट्रवादीत यायला इच्छूक आहेत अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

विरोधकांकडून आमचे आमदार जाणार अशा अफवा पसरवल्या जात आहे यावर नवाब मलिक यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. आमचे आमदार जाण्याऐवजी निवडणूकीच्या अगोदर भाजपात गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत यायला आतुर झाले आहेत.परंतु यावर कोणताच निर्णय झालेला नाही.मात्र यावर लवकरच निर्णय होवून त्याची माहिती दिली जाईल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, विरोधी पक्षाची सरकारे पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून विविध डावपेच खेळले जात आहे. मध्य प्रदेशातील कॉंग्रेसचे राज्य खालसा केल्यानंतर त्यांनी राजस्थानकडे मोर्चा वळविला; परंतु तेथे त्यांना पटकी खावी लागली. आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडे भाजपने डोळे वटारल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आघाडी सरकारनेही कंबर कसली असून राज्यातील महामंडळे, प्राधिकरण अध्यक्षपदाच्या नियुक्‍त्या तातडीने करण्यात येणार आहेत. त्यावर महाविकास आघाडीचे सदस्य असलेल्या आमदारांना संधी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. यात प्रमुख पक्ष असलेले शिवसेनेचे 56, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 54 आणि कॉंग्रेस पक्षाचे 44 आमदार आहेत. या शिवाय आघाडी सरकारला पाठिंबा देणारे काही लहान पक्षांचे तसेच अपक्ष आमदारही आहेत. राज्यात आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून "ते लवकरच पडणार' अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेषत: भाजपचे नेते अधूनमधून "हे सरकार जास्त दिवस चालणार नाही' अशी विधाने करीत असतात.  कर्नाटकनंतर भाजपने मध्य प्रदेशातील कॉंग्रेसचे आमदार फोडून त्या ठिकाणी भाजपचे सरकार स्थापन केले. त्यानंतर हाच प्रयोग राजस्थानमध्ये कॉंग्रेस सरकार पाडण्यासाठी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. पण, त्या ठिकाणी अद्यापही राजकीय सुंदोपसुंदी सुरूच आहे. 

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्न करीत असल्याचे सत्ताधारी पक्षाकडूनच सातत्याने आरोप करण्यात येत आहे. राजस्थाननंतर महाराष्ट्रात सरकारमधील पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.  मात्र, सत्ताधारी गटाच्या मंत्र्यांनीही भाजपच्या या प्रयत्नाला सुरूंग लावण्यासाठी भाजपतील आमदारच सत्ताधारी गटाकडे येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जाहीर केले होते. राज्य मंत्री बच्चू कडू यांनी गेल्याच आठवड्यात भाजपचे चाळीस आमदार सत्ताधारी महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचे जाहीर करून राज्यात खळबळ उडवून दिली होती. 

सत्ताधारी महाविकास आघाडीचे आमदार फोडून भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार, याची जाण महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही आहे. त्यामुळे नाराज आमदार भाजपच्या गळाला लागू नये, यासाठी महाविकास आघाडीतील तीनही मोठ्या पक्षाचे नेते काळजी घेत आहेत. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख