योगीजी, तुमच्या राज्यात पैसे घेतल्याशिवाय कामच होत नाही! भाजप आमदाराच्या मुलाचीच व्यथा - bjp mla son says nobody is working in uttar prasesh without taking bribe | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

योगीजी, तुमच्या राज्यात पैसे घेतल्याशिवाय कामच होत नाही! भाजप आमदाराच्या मुलाचीच व्यथा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 मार्च 2021

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजप सरकारचे रिपोर्ट कार्ड जाहीर केले असून, राज्यातील गुन्हेगारीत घट झाल्याचा दावा केला आहे. 

लखनौ : मागील चार वर्षांत राज्यात स्थिती सुधारल्याचा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज केला. आदित्यनाथ यांनी आज राज्य सरकारचे रिपोर्ट कार्ड जाहीर करुन राज्याची स्थिती सुधारल्याचा गवगवा केला. असे असताना भाजपच्या आमदाराच्या मुलाने योगींना राज्यातील वस्तुस्थितीचा आरसा दाखवला आहे. 

राज्य सरकारच्या चार वर्षांतील कामगिरीचा आलेख मांडताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, मागील चार वर्षांत उत्तर प्रदेश राज्य हे देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून समोर आले आहे. 'जीएसडीपी'मध्ये देशातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून राज्याला विकसित करण्याचे सरकारचे ध्येय आहे. भाजप २०१७ मध्ये सत्तेत आला त्यावेळी राज्यातील अनेक गावांत शाळा, रस्ते आणि विकास दिसतच नव्हता. काही आदिवासी क्षेत्रात तर मतदानाचा अधिकारही नव्हता. भाजपचे सरकार आल्यानंतर ते अधिकारापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली. 

योगींकडून स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा प्रकार सुरू असताना भाजप आमदाराच्या मुलाने राज्यातील वस्तुस्थिती सोशल मीडियावर मांडली आहे. यामुळे राज्य सरकारसोबत भाजपवरही नामुष्की ओढवली आहे. भाजपचे आमदार चेतराम यांचा मुलगा नीरज वर्मा याने सोशल मीडियावर राज्यातील भ्रष्टाचाराची उदाहरणे देऊन अखेरीस योगींकडेच परिस्थितीत सुधारणा करण्याची मागणी केली आहे. त्याने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ही वस्तुस्थिती मांडली आहे. 

हेही वाचा : योगीजी म्हणतात, उत्तर प्रदेशात चार वर्षांत एकही दंगल नाही 

नीरज वर्मा यांनी म्हटले आहे की, मागील चार वर्षे मी पाहत आहे. कारकुनापासून तहसिलदारापर्यंत कुणीही पैसे घेतल्याशिवाय कामच करीत नाही. प्रशासनात किती भ्रष्टाचार आहे हे मुख्यमंत्र्यांनी वेळीच तपासावे अन्यथा वेळ निघून जाईल. पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक खुलेआम लाच घेत आहेत. योगीजी तुमची इच्छा असेल तर चौकशी करुन पाहा, सगळीकडे पैसे घेणे सुरू असल्याचे दिसेल. चारित्र्याचे प्रमाणपत्र देण्यासाठीही कारकून 2 हजार रुपयांची लाच मागतात. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या मानसिकतेतून काम करीत आहेत. 

योगीजी, सरकारचा कालावधी एक वर्षच राहिला आहे. आमदाराचेही अधिकारी ऐकत नाहीत. यामुळे जनतेची कामे होताना दिसत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ मंत्र्यांनी याकडे लक्ष द्यायला हवे. वेळीच यावर नियंत्रण न आणल्यास मोठे संकट ओढवेल, असा इशाराही वर्मा यांनी दिला आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख