सीताही अग्निपरीक्षेला सामोरी गेली होती..तर मग मुख्यमंत्री अन् गृहमंत्र्यांचीही नार्को चाचणी करा! - bjp mla ram kadam demands narco test of uddhav thackeray and anil deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

सीताही अग्निपरीक्षेला सामोरी गेली होती..तर मग मुख्यमंत्री अन् गृहमंत्र्यांचीही नार्को चाचणी करा!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 मार्च 2021

परमबीरसिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर खळबळजनक आरोप केल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.  

मुंबई : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीरसिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर खळबळजनक आरोप केले आहेत. यावरुन राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. भाजपकडून देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसने देशमुखांची पाठराखण केली आहे. आता भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री देशमुखांची नार्को चाचणी करण्याची मागणी केली आहे. 

राम कदम म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे जर खोटे बोलत नसतील तर त्यांनी नार्को चाचणी सामोरे जावे. ते जर खरे बोलत असलील तर नार्को चाचणीतून सगळ्या बाबी स्पष्ट होतील. सीतेलाही अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागले होते. तर मग मुख्यमंत्री आणि गृहमंत्री नार्को चाचणीसाठी का टाळाटाळ करीत आहेत. परमबीरसिंह यांनी बदलीनंतर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले त्यामुळे त्यांचा यामागील हेतूही समोर यायला हवा. त्यांच्यावर राजकीय दबाव होता का याचीही चौकशी करण्याची आवश्यकता आहे.   

हेही वाचा : मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त राजभवनावर; राज्यपाल कोश्यारींशी चर्चा 

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख आणि निलंबित सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाझे यांची फेब्रुवारी महिन्यात भेट झाल्याचा परमबीरसिंह यांनी केलेला दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोडून काढला आहे. देशमुख हे ५ ते १५ फेब्रुवारी दरम्यान रुग्णालयात होते, तर १५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान ते क्वारंटाईन होते, असे पवार यांनी सांगितले. पवारांनी केलेल्या या दाव्यानंतर भाजपने पलटवार केला आहे. 

पवारांची पत्रकार परिषद सुरू असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर देशमुख यांनी १५ तारखेला पत्रकार परिषद घेतल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ देशमुख यांच्या ट्विटर अकाऊंटवरील आहे. १५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, १५ ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पजत्र परिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. 

फडणवीस यांनी त्यानंतर आणखी एक ट्विट केले असून परमबीर सिंग यांच्या पत्रावर शरद पवार यांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही, असे म्हटले आहे. परमबीर सिंग यांच्या पत्रात नमूद केलेला एसएमएसचा पुरावाच सांगतो की, ही भेट फेब्रुवारीच्या अखेरीस झालेली आहे. आता नेमके कोण दिशाभूल करते आहे?, असे फडणवीस यांनी नमूद केले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख