विधान परिषद निवडणूक : सासरेबुवा राष्ट्रवादीचे उमेदवार; भाजप आमदार नार्वेकरांची कसोटी

विधान परिषद निवडणुकीसाठी (MLC Election) प्रत्येक मत मोलाचे असल्याने अनेक समीकरणांची चर्चा
Ramraje-Rahul Narvekar
Ramraje-Rahul NarvekarSarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीतील (Rajya Sabha Election) पराभवाने अजूनही न सावरलेली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेस यांची महाविकास आघाडी विधान परिषदेच्या (MLC Election) निवडणूक तयारीला लागली आहे. या निवडणुकीतही एकेक महत्वाचे ठरणार आहे. या साऱ्या राजकारणात नातेसंबंध महत्वाचे ठरणार की राजकीय निष्ठा याचीही कसोटी लागणार आहे.

राष्ट्रवादी कॉग्रेसने दिग्गज नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना पुन्हा आमदार रिंगणात उतरवले आहे. या दोन्ही नेत्यांचा सर्व पक्षांत संपर्क आहे. त्यांच्या विजयात कोणतीच अडचण न येण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपच्या आमदारांशी संपर्क सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.

Ramraje-Rahul Narvekar
भेदरलेली शिवसेना ताकही फुंकून पिणार; आमदारांच्या मुक्कामाचे हॉटेल बदलले

या साऱ्या घडामोडींत रामराजेंचे जावई आणि भाजपचे आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची कसोटी लागणार आहे. एकीकडे सासरेबुवा आणि दुसरीकडे पक्षनिष्ठा असा पेच आहे. विधान परिषदेचे मतदान हे गुप्त असल्याने ते पक्षाच्या प्रतिनिधींना दाखवायचे नसते. त्यामुळे अशा नातेसंबंधांतील नेते कोणता राजकीय निर्णय या घडामोडीत घेणार, याची चर्चा होत राहणार आहे.

नार्वेकर हे मूळचे शिवसेनेचे. मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी शिवसेनेचे श्रीरंग बारणे खासदार झाले. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेत संधी दिली. मात्र २०१९ च्या निवडणुकीआधीच नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. कुलाबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत ते भाजपचे आमदार झाले. चांगले वकिल असलेले नार्वेकर या साऱ्या परिस्थितीत काय मार्ग पत्करणार, याची चर्चा होत राहणार.

Ramraje-Rahul Narvekar
विधान परिषद : भाजपच्या पाचव्या जागेचे गणित सोपे नाही.. 22 आमदारांना `पटवावे` लागेल!

रामराजेंचा सातारा जिल्ह्यातही प्रभाव आहे. तेथील इतर आमदारांशीही त्यांचा चांगला संपर्क आहे आणि राजकीय संबंधही आहेत. अनेक स्थानिक आघाड्यांत हे नेते एकत्र राहिले आहेत. त्यामुळे साताऱ्यातील राष्ट्रवादी सोडून इतर पक्षांचे आमदार रामराजेंना साथ देणार का, याचीही आतापासूनच चर्चा आहे.

दुसरीकडे भाजपच्या निशाण्यावर असलेले खडसे यांनीही भाजपमधील जुन्या समर्थक आमदारांची मोट बांधण्यासाठी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. खडसे यांचे उत्तर महाराष्ट्रातील समर्थक आमदार आज भाजपमध्ये आहेत. यातील अनेकांना खडसे यांनी बोलावून भाजपचे तिकिट दिले आणि आमदार केले. त्यामुळे भाजपमधील हे मते खेचण्यात खडसे यशस्वी होणार का, याचीही उत्सुकता राहणार आहे.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जूनला मतदान होणार आहे. त्यासाठी 27 मतांचा कोटा आवश्यक आहेत. शिवसेनेचे दोन उमेदवार त्यांच्याकडील असलेल्या 55 आमदारांच्या मतांवर निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादीकडे 53 आमदार आहेत. त्यामुळे त्यांनाही अडचण येणार नाही. पण हे मतदान गुप्त असल्याने काही मते फुटली तर इतर पक्षांची मते फोडण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यातून नवीन समीकरणे येऊ शकतात. भाजपचे पाच उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्या विजयासाठी भाजपला 135 मते हवी आहेत. जवळपास 22 मते भाजपला फोडायची आहेत. त्यामुळे इतर पक्ष आपापल्या आमदारांची काळजी घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com