गर्दी जमवण काय अवघड ? कार्यकर्त्याला सांगा, मुंबईला फुकट जायच, फुकट यायंच - दानवे

आपल काही कर्तव्य आहे की नाही? सरपंचाने किमान आपले सदस्य तरी स्वखर्चाने मुंबईतल्या भाजप - महामेळाव्याला आणले पाहिजे. मुंबई पाहून आलेला तो सदस्य गावात आल्यावर तुझ्याच नावाने उड्या मारील ना !"
BJP-ABD-Melava
BJP-ABD-Melava

औरंगाबाद : " ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याला मुंबईच आकर्षण असतं, तेव्हा सहा एप्रिल भाजप स्थापना दिवसाच्या निमित्ताने भाजपच्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला मुंबईत आणा, त्याला मुंबई दाखवा ,"असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार दानवे यांनी औरंगाबाद येथील आढावा बैठकीत केले.

"भाजपच्या लोकप्रतिनिधीला पक्षाकडून कधी झेंडा आणायला सांगितला जात नाही, कुठला खर्च करायला सांगितला जात नाही. मग आपल काही कर्तव्य आहे की नाही? सरपंचाने किमान आपले सदस्य तरी स्वखर्चाने मुंबईतल्या भाजप-महामेळाव्याला आणले पाहिजे. मुंबई पाहून आलेला तो सदस्य गावात आल्यावर तुझ्याच नावाने उड्या मारील ना  !" अशी युक्ती देखील रावसाहेब दानवे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितली.

 भाजप स्थापना दिनाच्या निमित्ताने 6 एप्रिलला मुंबईत बांद्रा-कुर्ला मैदानावर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत  मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले आहे. शिवसेनेचा दसरा आणि मनसेचा गुडीपाडवा मेळाव्याच्या धरतीवर यंदा भाजपने देखील स्थापना दिवसाला व्यापाक स्वरूप देत शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरु केली आहे.

मराठवाड्यातून या मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते घेऊन जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी शनिवारी तापडीया नाट्यमंदिरात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा, शहर, तालुका अध्यक्षाला दानवे यांनी गर्दी कशी जमवायची याचे धडे खास आपल्या स्टाईलमध्ये दिले.

भाजपची ताकद ओळखा

"महाराष्ट्रात आपल्याकडे 13 महापालिका, 12 जिल्हा परिषद, 72 नगरपालिका, पाच हजार सरपंच, 122 आमदार, 23 खासदार, केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे. एवढी मोठी भाजपची ताकद आहे ती ओळखा आणि आपल्या कार्यकर्त्यांनाही त्याची जाणीव करून द्या," अशा सूचना दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

"मुंबईतील मेळाव्यातून ही ताकद आपल्याला दाखवून द्यायची आहे. त्यासाठी जिल्हा, शहर, तालुका अध्यक्षांनी आपापल्या भागात बैठका घेऊन किती कार्यकर्ते मुंबईला येतील याचा अंदाज घ्या. प्रत्येक कार्यकर्त्याला बैठक आणि पक्षाच्या कार्यक्रमाला बोलवा, त्याला कार्यक्रमांची गोडी लावा म्हणजे कार्यकर्ता आपल्याशी जोडला जातो असे सांगत उगाच नाही मी सरंपचचा खासदार झालो ,"असे अनुभवाचे बोल देखील दानवेंनी उपस्थितांना सांगितले.

महापालिकेतील नगरसेवक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, ग्रामपंचायतींचे सरंपच यांनी आपापल्या भागातील कार्यकर्त्यांना मुंबईत आणण्याची जबाबदारी स्वाकारावी. लक्‍झरी बस, खाजगी गाड्या करा. याशिवाय मराठवाड्यातून दोन रेल्वे मुंबईसाठी सहा तारखेला सोडणार असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

फुकट जायचं, फुकट यायचं

"मेळाव्यासाठी गर्दी जमवण काही अवघड आहे का? असा सवाल करतांनाच गावात बिडी फुकत बसलेल्या कार्यकर्त्याला मुंबईला फुकट जायच, फुकट यायंच सांगा. त्याला म्हणा इथे बिडी फुकण्यापेक्षा मुंबईत सिगरेट फूक ! पहा हा फॉर्म्युला वापरून! ," असा सल्लाही रावसाहेब दानवे यांनी उपस्थितांना दिला.

मराठवाड्यातले फक्त भाजपचे पदाधिकारी देखील आणले तरी दोन लाख तीस हजारांची गर्दी मुंबईत होईल असा दावा देखील रावसाहेब दानवे यांनी बैठकीत केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com