कुंभमेळा दोन दिवसांत आटोपणार? भाजप नेत्यांच्या शिष्टाईला आखाड्यांचा प्रतिसाद - bjp leaders talk with akharas about concluding kumbh before schedule | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

कुंभमेळा दोन दिवसांत आटोपणार? भाजप नेत्यांच्या शिष्टाईला आखाड्यांचा प्रतिसाद

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव असणाऱ्या कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. यामुळे कुंभमेळा लवकरच आटोपण्याची चिन्हे आहेत.  

हरिद्वार : जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव असणाऱ्या कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कुंभमेळा पुढील दोन दिवसांत आटोपण्याची शक्यता आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून आखाड्यांशी चर्चा सुरू असून, याला अनेक आखाड्यांनी होकार दर्शविला आहे. याचबरोबर निरंजनी आखाड्याने आधीच कुंभमेळ्यातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. 

निरंजनी आखाडा हा कुंभमेळ्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा आणि नागा साधूंचा सर्वांत मोठा आखाडा आहे. या आखाड्यातील अनेक साधू पॉझिटिव्ह आल्याने कुंभमेळ्यातून 17 एप्रिलला बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव दास यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, अनेक आखाड्यांतील साधूंना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सुमारे 50 साधूंना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे समजते. 

या पार्श्वभूमीवर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी आखाड्यांशी चर्चा केली आहे. या चर्चेला अनेक आखाड्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार कुंभमेळा 30 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तो दोन दिवसांत आटोपता घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र, आखाड्यांमधील काही जण याला विरोध करीत आहेत. परंतु, कोरोना संसर्गाचा प्रकोप पाहता हे आखाडे या मागणीला होकार दर्शवतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कुंभमेळ्याचा अंतिम निर्णय उत्तराखंड सरकार घेणार आहे. आतापर्यंत सरकारने नियोजित वेळापत्रकानुसार 30 एप्रिलपर्यंत कुंभमेळा सुरूच राहील, अशी भूमिका घेतली होती. आता कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागल्याने मागील वर्षी दिल्लीत झालेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाशी मेळ्याची तुलना केली जात आहे. यामुळे उत्तराखंड सरकारही कुंभमेळा लवकर आटोपण्याची तयारी करीत आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

हरिद्वार, टिहरी आणि डेहराडून जिल्ह्यांत 670 हेक्टर जागेवर कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक आखाडे हे कोरोना चाचणी करुन घेण्यास नकार देत आहेत. यामुळे कोरोनाचा उद्रेक आणखी मोठा असण्याची शक्यता व्यक्त आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्येत कुंभमेळ्यामुळे प्रचंड मोठी वाढ होईल, असा इशारा तज्ञ देत आहेत. 

कुंभमेळ्यात 10 ते 14 एप्रिल या कालावधीत 2 लाख 36 हजार 751 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील दोन हजार 200 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यात येत असून, यात अनेक आखाड्यांच्या महंतांसह भाविक पॉझिटिव्ह सापडले आहेत, आणखी काही चाचण्यांचे अहवाल हाती आलेले नसून, हा आकडा वाढेल, अशी माहिती हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी शंभूकुमार झा यांनी दिली. 

कुंभमेळ्यात आतापर्यंत दोन शाही स्नान झाले आहेत. यातील पहिले 12 एप्रिलला आणि दुसरे 14 एप्रिलला झाले. ही पर्वणी साधण्यासाठी साधू-महंत, विविध आखाड्यांसह सुमारे 48.51लाख भाविक गंगा नदीवर आले होते. यातील बहुतांश हे मास्कविना होते. प्रचंड गर्दीमुळे सुरक्षित अंतर कुठेही दिसत नव्हते. शाही स्नानाची पुढील पर्वणी २७ एप्रिलला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख