दिल्लीतील बाबर रस्ताही आता इतिहासजमा होणार का?

भाजपकडून पुन्हा एकदा नामकरणाच्या मोहिमेला जोर चढू लागला आहे. दिल्लीतील बाबर रस्त्याचे नामकरण करण्याची मागणी आता करण्यात आली आहे.
bjp leader vijay goyal demands babar road to be renamed 5 august road
bjp leader vijay goyal demands babar road to be renamed 5 august road

नवी दिल्ली : बाबराच्या नावाचा टिळा लावणारी अयोध्येतील वास्तू इतिहासजमा झाल्यावर भाजपकडून पुन्हा एकदा नामकरणाची मोहीम सुरू होण्याची चिन्हे आहेत. राजधानी दिल्लीच्या मध्यवस्तीतील बाबर रस्त्याचेही नाव बदलण्याची मागणी भाजपने केली आहे.  माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते विजय गोयल यांनी या रस्त्याच्या नामफलकाला परस्पर काळे फासून त्याखाली ‘५ ऑगस्ट मार्ग’ असे नावही लिहिले आहे. 

आणीबाणीत अरुण जेटली यांच्याबरोबरीने तुरुंगवास भोगणारे गोयल एकेकाळी दिल्ली भाजपचे आक्रमक नेते होते. अलिकडे ते अशोक रस्त्यावरील त्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर नवनवे फलक लावण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ल्यूटियन्स दिल्लीच्या मध्यभागी मंडी हाऊस परिसरात बाबर रस्ता हा आहे. बंगाली मार्केट परिसरात बाबर रस्त्याजवळ त्याच नावाची गल्लीही आहे. शेजारीच तोडरमल राजाच्या नावाने रस्ता आहे. गोयल यांचा आक्षेप बाबर या नावाला असून, त्यांची मागणी लवकरच पूर्ण होण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

काश्‍मीरसाठीचे कलम ३७० रद्द केल्याची व राममंदिर भूमिपूजनाची ऐतिहासिक तारीख म्हणून ‘५ ऑगस्ट’ हे नाव या रस्त्याला द्यावे असे गोयल यांचे म्हणणे आहे. राममंदिराच्या भूमिपूजनाची देशभरात वातावरणनिर्मिती झाली होती. त्यावेळी दिल्लीत  गोयल हे भाजप कार्यकर्त्यांसह मंगळवारी (ता.4) रात्री बंगाली मार्केट परिसरात पोचले. तेथे त्यांनी ‘बाबर रोड’ नावाला काळे फासले व त्याच्याच खाली ‘५ अगस्त मार्ग’ असे लिहिले. नवी दिल्ली महापालिकेने लगेचच हा प्रकार दुरुस्त केला आहे. 

ल्यूटियन्स दिल्लीत रस्ता व त्याला लागून असलेली गल्ली यांना एकच नावे असतात. २०१४ च्या सत्तांतरानंतर दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचेही नाव बदलले होते. दिल्लीत बाबर, हुमायू, शहाजहान, सफदरजंग आदी मोगल बादशहांची नावे विविध रस्त्यांना आहेत. अन्यायी व अत्याचारी मुघल आक्रमकांच्या व बादशहांच्या नावे असलेल्या रस्त्यांची नावे तातडीने बदलावीत, असे संघ परिवाराचे म्हणणे आहे. यात अकबर रस्त्याचा समावेश नाही मात्र, बाकीची नावे बदलण्याच्या मागणीने आता जोर पकडला आहे. भारतातील सनदी अधिकाऱ्यांची निवड करणाऱ्या लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) मुख्यालयही शहाजहान रस्त्यावर आहे. 

रस्त्याचे नाव बदलण्याचे असे आहेत नियम 
दिल्लीतील रस्त्यांच्या नावांबाबतचे अधिकार राज्य सरकार व नंतर गृह मंत्रालयाकडे आहेत. नवी दिल्ली कायदा १९४९ नुसार राजधानीतील पुतळे व रस्त्यांच्या नावांबाबतचे अधिकार व नियम निश्‍चित आहेत. 
- ऐतिहासिक वास्तू-व्यक्ती यांची नावे परस्पर कोणालाही बदलता येत नाहीत. 
- रस्त्यांना अगोदरच नावे दिलेली आहेत तेथे बदल न करता नवे रस्ते व गावांना नावे देणे शक्‍य आहे. 
- नावांची सवय नागरिकांना झाली असेल ते अतिविशेष कारण असल्याशिवाय शक्‍यतो बदलू नये. 
- देशासाठी बलिदान केलेल्या त्या भागातील हुतात्म्यांचे नाव द्यायचे असेल तर त्यासाठी नामबदलाला परवानगी आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com