कलियुगातील हीच शोकांतिका..कावळे खीर खाताहेत अन् हंस दाणा! - bjp leader uma bharati wishes subramanian swamy | Politics Marathi News - Sarkarnama

कलियुगातील हीच शोकांतिका..कावळे खीर खाताहेत अन् हंस दाणा!

वृत्तसंस्था
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांना शुभेच्छा देणारे ट्विट उमा भारती यांनी केले असून, यावरुन मोठी चर्चा सुरू झाली आहे. 

भोपाळ : भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांना सहस्रचंद्रदर्शनानिमित्त शुभेच्छा देणारे ट्विट भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी केले आहे. यात त्यांनी स्वामींना हिरोची उपमा दिली आहे. याचवेळी स्वामींचे कौतुक करताना त्यांनी मनातील खदखदही व्यक्त केली आहे. यामुळे त्यांचा नेमका निशाणा कुणावर होता, याची चर्चा आता सुरू झाली आहे. 

उमा भारती यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, मी कायम सुब्रह्मण्यम स्वामी यांनी हिरो तसेच माझा आदर्श मानले आहे. स्वामींच्या जीवनातील सहस्रचंद्रदर्शन पूर्ण झाले असून, याचा मला आनंद आहे. माझ्या गुरुजीच्या ठिकाणी दिल्लीतील वसंत कुंजमध्ये याचा कार्यक्रमही झाला. स्वामी हे भारतीय राजकारणातील सर्वांत बुद्धिमान नेते आहेत. त्यांचा भारतीय नीतीचा अतिशय सखोल अभ्यास आहे. ते अतिशय हुशार हिंदू आहेत. 

कलियुगाची हीच शोकांतिका आहे की, हंस हा मोतीच्या जागी दाणे खात आहेत आणि कावळे खीर खात आहेत. मी स्वामींना कायम आनंदी पाहिले आहे. त्यांनी कधीही विचारधारेशी तडजोड केली नाही. मी त्यांच्याप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करीत आहे, असे उमा भारतींनी म्हटले आहे. 

सध्या स्वामी हे केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य करीत असल्याचे दिसत आहे. त्यांनी अनेकवेळा पक्षाला तोंडावर पाडल्याचे दिसून आले आहे. याचबरोबर उमा भारतींनाही पक्षाने बाजू फेकल्याचे चित्र आहे. त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून पक्षालाच घरचा आहेर दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

मी सरकारला आधीच धोक्याचा इशारा दिला होता; उमा भारतींचा गौप्यस्फोट

आणखी एका ट्विटमध्ये उमा भारतींनी म्हटले आहे की, स्वामींची अर्धांगिनी पारशी असून, पारशी हे सूर्याचे उपासक असतात. स्वामींची प्रतिभा सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नीने सूर्यविवाह केला आहे. ते दोघे एकमेकांपासून अभिन्न आहेत. मी ईश्वराकडे प्रार्थना करते की ते दोघे अनादी काळापासून अनंत काळापर्यंत एकमेकांसोबत राहावेत. त्यांच्या निरोगी, यशस्वी आणि दीर्घायूची मी प्रार्थना करते. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख