सुवेंदू अधिकारींच्या भावाच्या मोटारीवरील हल्ल्याने बंगालमधील वातावरण पेटले - bjp leader suvendu adhikari brother soumendus car attacked in west bengal | Politics Marathi News - Sarkarnama

सुवेंदू अधिकारींच्या भावाच्या मोटारीवरील हल्ल्याने बंगालमधील वातावरण पेटले

वृत्तसंस्था
शनिवार, 27 मार्च 2021

पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील 30 जागांसाठी आज मतदान झाले. मतदानादरम्यान हिंसेचे प्रकार घडले आहेत. 

कोलकता : पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 30 जागांसाठी आज मतदान झाले. काही भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या भावाच्या मोटारीवर हल्ला झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यामुळे बंगालमधील राजकीय वातावरण पेटले आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा यामागे हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. 

आज बंगालमध्ये मतदानादरम्यान काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. पूर्व मिदनापूर हा तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेले सुवेंदू अधिकारी यांचा जिल्हा आहे. त्यांचे भाऊ सौमेंदू अधिकारी यांच्या मोटारीवर कोंटाई येथे काही जणांनी हल्ला झाला. या हल्ल्यात सौमेंदू यांना काहीही झाले नसले तरी त्यांच्या चालकाला मारहाण करण्यात आली असून, मोटारीची तोडफोड करण्यात आली. तृणमूल काँग्रेसचे गटप्रमुख रामगोविंद दास यांच्या मदतीनेच हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. 

याबद्दल बोलताना सौमेंदू अधिकारी म्हणाले की, तृणमूलचे गटप्रमुख रामगोविंद दास आणि त्यांची पत्नी तीन मतदान केंद्रावर बोगस मतदान करवून घेत होते. मी तेथे पोचल्यामुळे त्यांना अडचणी झाली. त्यांनी माझ्या मोटारीवर हल्ला करुन माझ्या चालकाला मारहाण केली. यात भाजपचे चार कार्यकर्ते जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बंगालच्या पोलिसांबद्दल न बोलणेच बरे आहे. ते पोलीस नसून, तृणमूलचे कार्यकर्ते आहेत. 

या प्रकरणी भाजपच्या शिष्टमंडळानेही ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाची भेट घेतली. यानंतर बोलताना विजयवर्गीय म्हणाले की, मागील सहा वर्षांतील ही पहिलीच अशी निवडणूक आहे की ज्यात हिंसाचार आणि मतदान केंद्र ताब्यात घेण्याचे कमी प्रकार घडले. असे 10 टक्के प्रकारही पुन्हा घडू नयेत यासाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदानावेळी समाजकंटकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील भगवानपूर विधानसभा मतदारसंघात गोळीबारात दोन जवान जखमी झाले. हा हल्ला तृणमूलने केल्याचा आरोप भाजपने केला आहे. मेदिनीपूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रात तृणमूलच्या माजी सल्लागार रूकैया खातून आणि पक्षाचे नेते शेख मुजम्मल हुसेन हे थांबले होते. तरीही पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप भाजपने केला. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख