ममता बॅनर्जींच्या विरोधात भाजपने बंगालमध्ये स्मृती इराणींना उतरवले मैदानात - bjp leader smriti irani targets west bengal chief minister mamata banerjee | Politics Marathi News - Sarkarnama

ममता बॅनर्जींच्या विरोधात भाजपने बंगालमध्ये स्मृती इराणींना उतरवले मैदानात

वृत्तसंस्था
रविवार, 31 जानेवारी 2021

पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. 

हावडा : पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात आता भाजपने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांना मैदानात उतरवले आहे. 

केंद्रीय मंत्री अमित शहा हे आज पश्‍चिम बंगालच्या दौऱ्यावर येणार होते. परंतु, नवी दिल्लीतील इस्राईलच्या दूतावासासमोर दोन दिवसांपूर्वी झालेल्या बाँबस्फोटाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. त्यांच्याऐवजी स्मृती इराणी यांनी राज्याचा दौरा केला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी स्मृती इराणी यांची आज डुमरजला स्टेडिअममध्ये  जाहीर सभा झाली. पश्चिम बंगालच्या रणधुमाळीत या वेळी त्या पहिल्यांदाच उतरल्या आहेत. अमित शहाही या सभेत व्‍हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. 

स्मृती इराणी म्हणाल्या की, 'जय श्रीराम' या घोषणेचा अपमान करणाऱ्या पक्षात कोणताही देशभक्त एक मिनिटभरही थांबू शकत नाही. जो पक्ष आपसातच लढतो आणि स्वार्थासाठी केंद्र सरकारचा द्वेष करतो, अशा पक्षाचे समर्थन जनता करणार नाही. ममतादीदींचा तृणमूल काँग्रेस पक्ष सत्तेवरून जाऊन भाजप सत्तेत येणार आहे. 

ममता बॅनर्जी सरकारने लॉकडाउनच्या काळातही भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप इराणी यांनी या वेळी केला. त्या म्हणाल्या की, कोरोनाच्या साथीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ८० कोटी जनतेला आठ महिन्यांपर्यंत पाच किलो तांदूळ आणि एक किलो डाळ देण्याची व्यवस्था केली होती. परंतु, पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाने त्याची लूट केली. 

कोरोना संकटाच्या काळात मूळगावी परतलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी गरीब रोजगार योजनेअंतर्गत देशभरात श्रम दिवसांचे आयोजन करण्यात आले. मात्र, बंगालमध्ये त्याची अंमलबजावणी झाली नाही. केंद्र सरकारने श्रमिक रेल्वे सोडल्या त्यांची ममता बॅनर्जींनी ‘कोरोना एक्स्प्रेस’ अशी हेटाळणी केली. देशातील विविध भागात काम करीत असलेल्या बंगालच्या स्थलांतरितांना त्या विषाणू मानतात, असे स्मृती इराणी म्हणाल्या. 

तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते राजीव बॅनर्जी यांनीही या वेळी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, पश्‍चिम बंगाल सरकारची स्वास्थ साथी ही आरोग्य योजना फसवी आहे. राज्यातील प्रत्येक कुटुंबासाठी पाच लाख रुपयांच्या मोफत वैद्यकीय विमा योजनेसाठी आवश्‍यक असलेला निधी पश्‍चिम बंगाल सरकारच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. राज्यातील ९९ टक्के विकासकामे आधीच झाली असल्याचा दावा तृणमूल काँग्रेस पक्ष करीत असल्याने त्यांना पुन्हा सत्तेवर येण्याची काहीच गरज नाही. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख