जळगाव : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भूखंड प्रकरणी आरोप केले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी किरीट सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत किंवा जर ते खोटे असतील तर सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे आव्हान केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री व भाजप नेते डॉ.सुभाष भामरे यांनी दिले आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्षे पूर्ण झाले आहे. त्या संदर्भात सरकारचे अपयश जनतेसमोर आणण्यासाठी भाजपतर्फे राज्यभर पत्रकार परिषद घेण्यात येत आहे. त्याच अंतर्गत जळगाव येथे जिल्ह्याचे प्रभारी खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी उपस्थित होते.
फडणवीसांवरील व्देषापोटी ‘जलयुक्त’चे कॅगकडून चुकीचे रिपोर्ट #Sarkarnama #MarathiNews #SarkarnamaNews #PoliticalNews #Devendrafadnavis #SubhashBhamre #CAG #BJP #Viral #ViralNews @DrSubhashMoS @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra https://t.co/KasHq3uhxX
— Sarkarnama (@SarkarnamaNews) November 29, 2020
या वेळी बोलताना डॉ.भामरे म्हणाले, गेल्या वर्षभरात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोणतेही विकासाचे काम केले नाही. केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याचे काम या सरकारने केले. ‘कोविड’शी सामना करण्यातही राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारने शेतकऱ्यांना मदत केलेली नाही, मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकविण्यातही हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे आज मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलेले नाही.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात जलयुक्तची चांगली कामे झाली आहेत. मात्र, फडणवीस यांच्यावर असलेल्या व्यक्तीगत आकसापोटी या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून ‘कॅग’चा चुकीचा अहवाल सादर करून बदनामी करण्यात येत आहे, असा आरोपही भामरे यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यात राबविलेल्या जलयुक्त शिवाराबाबत बोलताना ते म्हणाले की, फडणवीस सरकारने ही योजना राबविल्यामुळे राज्यातील तब्बल २२ हजार खेड्यात सिंचन झाले,त्यामुळे आज शेतकरी समाधानी आहे. मात्र, केवळ फडणवीस यांचा व्देष असल्याने या महाविकास आघाडी सरकारने ‘कॅग’च्या माध्यमातून चुकीचे अहवाल सादर करून त्यांच्यावर आरोप केले आहे. गेल्या वर्षभरात या सरकारने केवळ स्थगिती देण्याचेच काम केले आहे. त्यामुळे हे महाविकास तर महास्थगिती सरकार आहे, असेही भामरे यांनी सांगितले.
Edited by Sanjay Jadhav

