भाजपच्या शाजिया इल्मींशी डिनर पार्टीत केलेलं गैरवर्तन भोवलं...माजी खासदारावर गुन्हा दाखल - bjp leader shazia ilmi files complaint against bsp ex mp akbar ahmed | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या शाजिया इल्मींशी डिनर पार्टीत केलेलं गैरवर्तन भोवलं...माजी खासदारावर गुन्हा दाखल

वृत्तसंस्था
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

भाजपच्या महिला नेत्याशी एका माजी खासदाराने गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. 

नवी दिल्ली : दिल्ली भाजपच्या उपाध्यक्षा शाजिया इल्मी यांच्याशी एका पार्टीत माजी खासदाराने गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या माजी खासदाराचे नाव अकबर अहमद 'डम्पी' असे आहे. ते बहुजन समाज पक्षाचे नेते आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, अकबर अहमद यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केल्याचे समोर आले आहे.  

शाजिया इल्मी यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दिल्लीतील वसंत कुंजमध्ये  चेतन सेठ यांनी 5 फेब्रुवारीला एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला मी उपस्थित होते आणि अहमद हेसुद्धा पार्टीला आले होते. या पार्टीला अनेक देशांचे राजदूत हजर होते. मी चिलीच्या राजदूतांशी चर्चा करीत असताना अहमदही चर्चेत सहभागी झाले. त्यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच, अहमद यांनी माझ्याशी गैरवर्तन केले आणि माझ्याबद्दल अश्लील शेरेबाजी केली. 

हेही वाचा : स्वपक्षातील विवाहित नेत्याशी लफडं भाजपच्या महिला नेत्याला पडलं महागात!

अहमद यांनी मला धमकावले आणि माझा अवमान करणारी भाषा वापरली. मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करुनही त्यांनी गैरवर्तन कायम ठेवले, असेही शाजिया यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 506 (धमकावणे) आणि कलम 509 (विनयभंग) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिल्लीचे पोलीस उपायुक्त इंगितप्रतापसिंह यांनी अहमद यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यास दुजोरा दिला आहे. शाजिया इल्मी यांची तक्रार आमच्याकडे आल्यानंतर 7 फेब्रुवारीला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे, असे सिंह यांनी सांगितले. 

शाजिया इल्मी या आधी पत्रकार होत्या. त्यांनी जनलोकपाल आंदोलनात सहभाग घेतला होता. नंतर त्या आम आदमी पक्षात दाखल झाल्या. आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही त्यांना स्थान देण्यात आले होते. परंतु, त्यांनी मे 2014 मध्ये आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन 2015 मध्ये भाजपशी घरोबा केला होता. सध्या त्या भाजपच्या दिल्ली उपाध्यक्षा आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख