केंद्रातील सर्वांत तरुण मंत्री ते बिहारचा मंत्री...शहनवाज हुसेन यांचा उलटा प्रवास! - bjp leader shahnawaz hussain inducted in bihar cabinet | Politics Marathi News - Sarkarnama

केंद्रातील सर्वांत तरुण मंत्री ते बिहारचा मंत्री...शहनवाज हुसेन यांचा उलटा प्रवास!

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

सत्ताधारी भाजप आणि जेडीयूच्या सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला आहे. यात शहनवाज हुसेन यांचे नाव अग्रभागी आहे. 

पाटणा : बिहारमधील भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज झाला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात नव्याने 17 मंत्र्यांचा समावेश झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात सर्वाधिक चर्चेतील नाव शहनवाज हुसेन यांचे आहे. आज मंत्रिपदाची पहिली शपथ त्यांनाच देण्यात आली. केंद्रातील सर्वांत तरुण मंत्री म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास बिहारमधील मंत्रिपदापर्यंत पोचला आहे. 

राज्यपाल फागू चौहान यांनी आज 17 नवीन मंत्र्यांना शपथ दिली. यात भाजपचे 9 आणि जेडीयूचे 8 मंत्री आहेत. यात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसेन, प्रमोद कुमार, आलोक रंजन झा, नितीन नवीन, नारायण प्रसाद, नीरजसिंह बबलू, सुभाषसिंह, सम्राट चौधरी, जनक राम यांचा समावेश आहे. जेडीयूच्या मंत्र्यांमध्ये श्रवणकुमार, संजय झा, लेसी सिंह, सुनीलकुमार, जयंत राज, मदन साहनी, सुमितसिंह, जमा खान यांचा समावेश आहे. राज्यातील मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या आता 30 वर गेली असली तरी अद्याप सहा जागा रिकाम्या आहेत. 

हेही वाचा : भाजपमध्ये सवर्णांना डावललं जातंय; आमदाराचाच पक्षाला घरचा आहेर

शहनवाज हुसेन यांना आज सर्वांत आधी मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. गेली दोन दशके राष्ट्रीय राजकारणात त्यांचा वावर असून, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे ते अतिशय निकटवर्ती मानले जातात. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य व राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी शाहनवाज हुसेन यांच्यावर आहे. मात्र, पक्षाने त्यांना केंद्रातून थेट बिहारमध्ये पाठवले आहे. त्यांच्या या उलट्या प्रवासाची आता चर्चा सुरू झाली आहे. 

हेही वाचा : मंत्रिमंडळ विस्ताराचं घोड गंगेत न्हालं...

किशनगंज व भागलपूरमधून लोकसभेवर निवडून येणारे हुसेन हे १९९० च्या दशकापासून दिल्लीतच रमले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातील ते सर्वांत तरुण मंत्री होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा अनपेक्षित पराभव झाला होता. त्यानंतर २०१९ मधे तर त्यांना तिकिटच नाकारण्यात आले होते. त्यांना दिल्ली सोडायची नव्हती मात्र,  सुमारे ७ वर्षे पक्षाने बाजूला फेकल्याने त्यांनी बिहारचा पर्याय अखेर स्वीकारला, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा : बिहारमध्ये नितीशकुमारच मोठा भाऊ...

भाजपच्या सध्याच्या नेतृत्वाने वाजपेयींशी जवळीक असणाऱ्या बहुतांश नेत्यांना आता बाजूला केले आहे. यात केवळ हुसेन हे शिल्लक राहिले होते. अखेर त्यांना बिहारमध्ये पाठवण्याच्या बहाण्याने दिल्लीतून दूर करण्यात आले आहे. हुसेन यांना बिहारमध्ये उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बिहारमध्ये उद्योग क्षेत्राचे अस्तित्वच नसल्याने हुसेन यांच्यावर काम नसलेल्या खात्याचीच एका अर्थाने जबाबदारी देऊन त्यांचे राज्यात महत्व वाढू नये याचीही काळजी घेण्यात आली आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख