bjp leader ravi shankar prasad targets rahul gandhi on pm cares fund issue
bjp leader ravi shankar prasad targets rahul gandhi on pm cares fund issue

कोरोना विरोधातील देशाची लढाई राहुल गांधी पहिल्या दिवसापासून कमकुवत करताहेत...

पीएम केअर्स निधीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर भाजप बॅकफूटवरुन आता आक्रमक भूमिकेत गेली आहे. भाजपने या प्रकरणी राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.

नवी दिल्ली : कोरोना महामारीविरूध्दच्या लढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थापन केलेल्या पीएम केअर्स निधीतील रक्कम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीमध्ये (एनडीआरएफ) वळविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या निकालानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी भाजपला लक्ष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर चौफेर हल्ला चढवण्यात येत आहे.  

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी न्यायालयीन निकालानंतर गांधी घराण्यावर हल्लाबोल केला आहे.  ते म्हणाले की, या निकालामुळे राहुल गांधी यांचे कुटिल प्रयत्न व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांना जोरदार धक्का बसला आहे. काँग्रेस व त्याच्या साथीदारांची द्वेषपूर्ण मानसिकता असली तरी सत्याचे तेज कायम राहते. वारंवार आरोप व आरडाओरड करण्याच्या राहुल गांधी यांच्या प्रयत्नांना जनतेने वारंवार नाकारून पीएम केअर्स निधीत मोठ्या मनाने भरघोस मदत करणे सुरू ठेवले आहे. 

पीएम केअर्स निधीचा सारा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याचे लेखापरीक्षणही होणार आहे, असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. ते म्हणाले की, सरकार प्रामाणिकपणे काम करण्यासाठी ओळखले जाते. कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी स्थापन झालेल्या या निधीतील प्रत्येक पैशाचा हिशोब जाहीर केला जात आहे. तो यापुढेही केला जाईल. या निधीचे विश्‍वस्त, अध्यक्ष साऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.  

राहुल गांधी यांनी कोरोनाविरूध्द देशाची लढाई कमकुवत करण्यासाठी अगदी पहिल्या दिवसापासून प्रयत्न केले आहेत. डॉक्‍टर, परिचारिका, सफाई कर्मचारी, पोलिस या कोरोनायोध्यांसाठी सन्मानाचे प्रतिक म्हणून पंतप्रधानांनी केलेल्या टाळ्या व थाळ्या वाजविण्याच्या आवाहनाचीही राहुल गांधी यांनी थट्टा केली होती, असा टोला प्रसाद यांनी लगावला.  

एका कुटुंबाची मालमत्ता असलेल्या राजीव गांधी फाउंडेशनला चीनने आर्थिक मदत दिली होती. त्या संस्थेने तयार केलेल्या अहवालात भारत-चीन यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी चीनसाठी भारताची बाजारपेठ खुली करायला हवी हे स्पष्टपणे म्हटले होते, असा दावा प्रसाद यांनी केला. 

पीएम केअर्स निधीचा हिशोब (आकडे कोटींमध्ये) 
आतापावेतो जमा : 3100 
व्हेंटीलेटर्स खरेदीसाठी दिले : 2000 
प्रवासी कष्टकऱ्यांना सुविधा देण्यासाठी  : 1000 
कोरोना लसीच्या संशोधनासाठी : 100

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com