केंब्रिज अॅनालिटिकाशी संबंध असलेल्यांनी दुसऱ्यांना शिकवू नये; रविशंकर प्रसाद यांचा टोला

देशातील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या प्रक्षोभक विधानांकडे फेसबुक दुर्लक्ष करीत आहे, असा दावा वॉल स्ट्रीट जर्नलने केला आहे. आता यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे.
bjp leader ravi shankar prasad targets rahul gandhi and congress party
bjp leader ravi shankar prasad targets rahul gandhi and congress party

नवी दिल्ली : देशातील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांकडे फेसबुक दुर्लक्ष करीत आहे, असा दावा वॉल स्ट्रीट जर्नलने केला आहे. या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ उडाला आहे. भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर नियंत्रण असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. यावर भाजप नेते व केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

वॉल स्ट्रीट जर्नलने फेसबुकबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. प्रक्षोक्षक विधानांबाबतचे फेसबुकचे नियम हे भाजप नेत्यांकडे दुर्लक्ष करणारे आहे, असे म्हटले आहे. सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी वेगळा न्याय आणि इतर पक्षांतील नेत्यांना वेगळा न्याय लावण्याचे काम फेसबुक करीत आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांवर कारवाई केल्यास कंपनीच्या भारतातील व्यवसायाला फटका बसेल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटल्याचे वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तात म्हटले आहे. 

या मुद्द्यावरुन राहुल गांधींनी भाजपला लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, देशात फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नियंत्रण आहे. त्यांच्या प्रभावाचा वापर करुन ते खोट्या बातम्या पसरवून समाजात दुही निर्माण करीत आहेत. अखेर अमेरिकी माध्यमांनी फेसबुकचा खरेपणा जनतेसमोर आणला आहे. 

राहुल गांधी यांच्यी टीकेचा भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी समाचार घेतला. प्रसाद यांनी राहुल आणि काँग्रेसचे नाव न घेता टोला लगावला आहे. ते म्हणाले की, स्वत:च्या पक्षातील नेत्यांवर नियंत्रण न ठेवू न शकणाऱ्या पराभूतांनी भाजप आणि आरएसएसचे संपूर्ण जगावर नियंत्रण असल्याचे रडगाणे गाऊ नये. तुम्ही तर केंब्रिज अॅनालिटिका आणि फेसबुकसोबत निवडणुकीत डेटाचा शस्त्रासारखा वापर करताना रंगेहात सापडला होतात. तुमच्याकडे आम्हाला प्रश्न विचारण्याचे धाडस कोठून येते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त काल लाल किल्ल्यावरुन देशाला उद्देशून केलेल्या भाषणात आत्मनिर्भर भारताची हाक दिली आहे. यावरुन विरोधी पक्षांनी त्यांना घेरले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, आत्मनिर्भर भारताची पायाभरणी पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल आणि स्वातंत्र्यसैनिकांनी केली. आता सरकारकडून सरकारी कंपन्या विकण्यात येत आहेत. हे सरकार रेल्वे आणि विमानतळ या क्षेत्रात खासगी कंपन्यांना प्राधान्य देत आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com