रुग्णाला न्याय देण्यासाठी दरेकर यांनी रुग्णालयावर धडक मारली पण..... - BJP Leader Pravin Darekar Fighting Aginst Mumbai Hospitals for High Bills | Politics Marathi News - Sarkarnama

रुग्णाला न्याय देण्यासाठी दरेकर यांनी रुग्णालयावर धडक मारली पण.....

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

बिल भरेपर्यंत मृतदेह अडकवून ठेवणाऱ्या या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा दाखल करून कारवाई व्हावी. हे रुग्णालय सील करुन मुंबई महापालिका आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी यासाठी आंदोलन करून अशा रुग्णालयांना टाळे ठोकेल, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे

मुंबई : गरीब कोविड रुग्णाला एकवीस लाखांचे अव्वाच्या सव्वा बिल दिल्याचे कळल्यावर रुग्णालयाला जाब विचारण्यासाठी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मालाडच्या रुग्णालयावर धडक मारली. पण त्याआधीच त्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. मात्र रुग्णालयाने अडवलेला मृतदेह दरेकर यांच्यामुळे नातलगांच्या ताब्यात मिळाला व जादा बिल देखील माफ झाले.

मालाडच्या लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात आज हा प्रकार घडला. एका रुग्णाला 21 लाखांचे बिल दिल्याची तक्रार रुग्णाच्या नातलगांनी काल दरेकर यांना केली. त्यासाठी कर्ज काढण्याचा निर्णय या गरीब कुटुंबाने घेतला. त्यामुळे दरेकर यांनी तेथे जाऊनच रुग्णालयाला जाब विचारण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार ते आज सकाळी तेथे गेले देखील. मात्र त्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला होता, तरीही उरलेले १३ लाख रुपये देईपर्यंत रुग्णालयाने मृतदेहदेखील अडवून ठेवला. दरेकर यांनी तेथे जाऊन रुग्णालय व्यवस्थापनाला जाब विचारला व त्यांच्या बिलातील फोलपणा दाखवून दिला. त्यामुळे रुग्णालयाने उरलेले बिल माफ केले व मृतदेहदेखील ताब्यात दिला, असे दरेकर यांनी सांगितले.

बिल भरेपर्यंत मृतदेह अडकवून ठेवणाऱ्या या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा दाखल करून कारवाई व्हावी. हे रुग्णालय सील करुन मुंबई महापालिका आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी यासाठी आंदोलन करून अशा रुग्णालयांना टाळे ठोकेल, असा इशाराही दरेकर यांनी दिला.

 दरेकर यांनी बिलाची तपाणी केली, हा रुग्ण साधारण पंधरा-वीस दिवस तेथे होता. त्याला बेड चार्जेस, ऑक्सिजन चार्जेस व बायोपॅक चार्जेस असे एकाचवेळी दोन-दोन प्रकारचे चार्जेस बिलात लावण्यात आले. एका पीपीई किट साठी साडेतीन हजार रुपये लावले. 'बायोमेडिकल वेस्ट चार्जेस रोजचे अडीच हजार रुपयांप्रमाणे पुर्ण बिलात ७७ हजार ५०० रुपये बिलात लावले. औषधांचे बिल तब्बल १० लाख ६२ हजार लावल्याचे दरेकर यांनी दाखवून दिले. 

पीपीई किट चे बिल तसेच बायोमेडिकल वेस्ट चे बिल रोज प्रत्येक रुग्णांकडून साडेतीन व अडीच हजार असे का घेतले जाते, प्रत्येक रुग्णावर यासाठी एवढा खर्च होतो का, असे दरेकर यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला विचारले. त्यामुळे रुग्णालयाने माघार घेतल्याने दरेकर म्हणाले. कुर्ला येथील एका रुग्णालयाने देखील असेच रुग्णाला प्रचंड बिल लावले होते, तेव्हाही दरेकर यांनी तेथे जाऊन जाब विचारला होता. सरकारने केवळ परिपत्रके काढली आहेत, मात्र सरकारचे त्यावर नियंत्रण नाही, अशीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख