स्वपक्षातील विवाहित नेत्याशी लफडं भाजपच्या महिला नेत्याला पडलं महागात! - bjp leader pamela goswamis father complaint led her arrest by police | Politics Marathi News - Sarkarnama

स्वपक्षातील विवाहित नेत्याशी लफडं भाजपच्या महिला नेत्याला पडलं महागात!

वृत्तसंस्था
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

भाजपच्या महिला नेत्याला अटक झाली असून, यामागे स्वपक्षातील नेत्याशी असलेले लफडे कारणीभूत ठरले आहे. 

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप अडचणीत आल्याचे चित्र आहे. भाजपच्या महिला नेत्यालाच अमली पदार्थांसह अटक झाली आहे. त्या नेत्याला अटक होण्यामागे तिचे स्वपक्षातील विवाहित नेत्याशी असलेले प्रेमसंबंध कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. याबाबत तिच्या वडिलांनीच पोलिसांकडे केलेल्या तक्रारीतून ही बाब उघड झाली आहे. 

भारतीय जनता युवा मोर्चाच्या राज्य सरचिटणीस पामेला गोस्वामी यांना अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पामेला, युवा मोर्चाचा नेता प्रबीर डे यांना सुरक्षारक्षकासह दक्षिण कोलकत्यातील न्यू अलिपूर परिसरातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 100 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. त्याची किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थांच्या तस्करीत काही काळापासून पामेला यांचा सहभाग आहे. त्या अमली पदार्थांची खरेदी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून पामेला त्यांचा साथीदार प्रबीर डे आणि सुरक्षारक्षकाला अटक केली. त्यांच्याकडून कोकेन जप्त करण्यात आले. 

हेही वाचा : बंगालमध्ये भाजपला झटका...

पामेला यांचे प्रबीर डे या स्वपक्षातील विवाहित नेत्याशी प्रेमसंबंध होते. त्यानेच त्यांना अमली पदार्थांचे व्यसन लागले. यामुळे तिच्या वडिलांनीच मागील वर्षी पोलिसांकडे तक्रार केली होती.  या तक्रारीत त्यांनी म्हटले होते की, डे याचा विवाह झाला असून, त्याला एक मुलगी आहे. विवाहबाह्य संबंध कायम ठेवण्यासाठी डे यानेच माझ्या मुलीला अमली पदार्थांचे व्यसन लावले. मी अनेकवेळा यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला पण दोघांनीही मला जुमानले नाही. त्यामुळे माझ्या मुलीला अमली पदार्थांच्या जाळ्यातून पोलिसांनी सोडवावे. 

हेही वाचा : महिला नेत्याच्या आरोपावर भाजपचे नेते म्हणाले, तर मी राजकारणातून संन्यास घेईन!

या तक्रारीनंतर पोलिसांचे पामेला यांच्यावर लक्ष होते. त्या नेमके कोणते अमली पदार्थ घेतात याचा उल्लेख त्यांच्या पित्याच्या तक्रारीत नव्हता. यामुळे पोलिसांना याचा शोध घेण्यास काही कालावधी लागला. अखेर पामेला या रंगेहाथ अमली पदार्थांसह पोलिसांच्या जाळ्यात सापडल्या. डे यांच्यासोबत असलेले प्रेमसंबंध अखेर त्यांना महागात पडले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख