नारायण राणे म्हणतात, हा निर्णय तर सर्व भारतीयांच्या मनातील निर्णय! - bjp leader narayan rane wlecomes supreme court decision in sushant case | Politics Marathi News - Sarkarnama

नारायण राणे म्हणतात, हा निर्णय तर सर्व भारतीयांच्या मनातील निर्णय!

वृत्तसंस्था
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासावरुन उठलेला गदारोळ अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने संपला आहे. भाजप नेते नारायण राणे या प्रकरणी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. 

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. याबाबत सर्व सहकार्य करण्याचे निर्देशही न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. सुशांतच्या मृत्यूच्या तपासावरुन मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला गदारोळ अखेर संपला आहे. भाजप नेते नारायण राणे यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, सुशांत प्रकरण सीबीआयकडे देण्याचा निर्णय म्हणजे सर्व भारतीयांच्या मनातला निर्णय आहे, असे म्हटले आहे. 

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात सक्त वसुली संचालयानेही (ईडी) उडी घेतली. सुशांतचा मृत्यू आणि आर्थिक अनियमतितेप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

सुशांतची आत्महत्या नसून हत्या आहे, असे सांगून नारायण राणे म्हणाले की, महाराष्ट्र सरकार सुशांतच्या प्रकरणामध्ये तपास करण्यास अपयशी ठरले आहे. मुंबई पोलिसांचे नाव जगात होते, पण आज या प्रकरणामुळे ते बदनाम झाले आहेत. सुशांतची आत्महत्या नसून ती हत्या आहे. ही हत्या दाबण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, त्यांच्यामुळे मुंबई पोलीस  बदनाम झाले आहेत. 

राणे यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की,  महाराष्ट्रात इतकी लोक आहेत मग यांनाच का टार्गेट करण्यात आले. काहीतरी असल्याशिवाय असे घडणार नाही. स्वत:च ते सांगतात की माझा काही संबंध नाही, परंतु यात काहीतरी वास येतो आहे. संजय राऊत म्हणतात की आदित्य यांचा काहीही संबंध नाही.  राऊतांचा काय संबंध, त्यांना सांगितले कोणी? यात नक्कीच कोणीतरी राजकारणी मंत्री असून, त्याला वाचवण्यासाठी हे सगळे करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने संजय राऊत तोंडावर पडले आहेत. त्यांच्याबाबत बोलावेसे वाटत नाही. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख