सरनाईकांना नेमकी भीती कशाची...ईडीची की कोरोनाची? - bjp leader kirit somaiya targets shiv sena leader pratap sarnaik over ed inquiry | Politics Marathi News - Sarkarnama

सरनाईकांना नेमकी भीती कशाची...ईडीची की कोरोनाची?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे. यावरुन राज्यात मोठा गदारोळ सुरू आहे.  

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयांवर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकल्यानंतर मोठा गदारोळ सुरू झाला आहे. सरनाईक यांना चौकशीसाठी आज हजर राहण्यासाठी ईडीने समन्स बजावले होते. मात्र, सरनाईक हे क्वारंटाइन झाले असून, त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी मागितला आहे. यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सरनाईकांना लक्ष्य केले आहे. 

ईडीने आमदार सरनाईक आणि त्यांचा पुत्र विहंग यांना आज चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र, दोघेही चौकशीसाठी हजर झाले नाहीत, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली. ईडीने काल एकूण 10 ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यात प्रताप सरनाईक यांचे घर, मुलांचे घर, कार्यालये ही ठिकाणे होती. परदेशात पैसे पाठवल्याप्रकरणी हे छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. 

प्रताप सरनाईक यांच्या मेहुण्याने ईडीला या संदर्भात पत्र दिले आहे. यात चौकशीसाठी हजर राहण्यास एक आठवड्याला कालावधी त्यांनी मागितला आहे. सरनाईक हे बाहेरुन मुंबईत आल्याने त्यांना नियमानुसार क्वारंटाइन करण्यात आले आहे. याचवेळी प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश यांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. दुसरे पुत्र विहंग यांची पत्नी हायपरटेन्शनमुळे रुग्णालयात दाखल असून, ते पत्नीसमवेत रुग्णालयात थांबले आहेत. 

सरनाईक यांचे मेहुणे आज हे पत्र घेऊन ईडीच्या कार्यालयात आले होते. प्रताप सरनाईक आणि विहंग यांना आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. दोघांनाही चौकशीसाठी हजर राहण्यास एक आठवड्यांचा कालावधी द्यावा, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. 

या मुद्द्यावर किरीट सोमय्या यांनी सरनाईकांना लक्ष्य केले आहे. सरनाईकांना नेमकी कशाची भीती ईडी की कोरोनाची, असा सवालही त्यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले असून, ते आज ईडीच्या चौकशीला हजर राहिले नाहीत, असे मी ऐकले. त्यांना नेमकी भीती कशाची कोरोना की ईडी की करचुकवेगिरी आणि बेनामी व्यवहारांची? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरनाईकांना काल भेटलेल्या सर्वांना क्वारंटाइन होण्यास सांगणार का? 

ठाकरे सरकारमधील नेते भ्रष्टाचार आणि बेनामी व्यवहारांवर पांघरूण घालण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रताप सरनाईकांनी ईडीच्या चौकशीला सामोरे जावे. विदेशी मालमत्तांबाबतच्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावीत. कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. 

आमदार सरनाईक यांचे मुंबई तसेच ठाणे येथील कार्यालये आणि घरावर ईडीने काल छापा टाकत कारवाई केली होती. दहा ठिकाणी छापा टाकून कारवाई केल्यानंतर सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोचले होते. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांची चौकशी सुरू केली होती. ईडीने सरनाईक यांचे पुत्र विहंग यांची काल पाच तास कसून चौकशी केली आहे. चौकशी झाल्यानंतर ते ठाण्याला रवाना झाले होते.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख