महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत? - bjp leader kirit somaiya targets minister jitendra awhad | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जुलै 2021

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. 

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी (MVA) सरकारमधील अनेक नेत्यांवर सध्या सक्त वसुली संचालनालयासह (ED) केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सुरू आहे. भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. आव्हाडांनी माहिती अधिकार (RTI) कार्यकर्ता प्रवीण कलमे (Pravin Kalme) याच्या मदतीने वसुलीचा धंदा मांडला होता. कलमे हा आव्हाडांचा सचिन वाझे आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. 

पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्या म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांचा कोरोना काळातील भ्रष्टाचार समोर आला आहे.  ६ जुलै २०२० रोजी ८१ आरटीआय अर्जांचे उत्तर द्या, असा आदेश  आव्हाडांनी दिला होता. त्यावेळी मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन होते. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) कार्यालयात १५ टक्के उपस्थिती होती. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कोरोनातून बरे होऊन कामावर रुजू झाले होते. त्यावेळी प्रवीण कलमेच्या 81 अर्जांवर ६ जुलै २०२० रोजी संपूर्ण माहिती मागवण्यात आली. 

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये कलमे यांच्यासोबत तातडीने संयुक्त बैठक घ्या, अर्जदार कलमे यांच्यासोबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अभियंतासोबत संयुक्त पाहणी  करा आणि एसआरए नियमांतर्गत १ जानेवारी 2004 पासून मंजूर करण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांची माहिती द्या, असे आदेश आव्हाडांनी दिले होते. या आदेशानुसार 21 प्रकल्पांची संयुक्त पाहणी करण्यात आली. याबाबत मंत्रालयातून सातत्याने पाठपुरावा होत होता. ही सगळी माहिती मिळाल्यानंतर आव्हाडांनी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. लॉकडाउन काळात एका आरटीआय कार्यकर्त्याच्या मागणीवरुन 6 दिवसांत 81 प्रकल्पांचे अहवाल तातडीने का मागण्यात आले? आव्हाड आणि कलमे यांचा नेमका संबंध काय, असा सवाल सोमय्या यांनी केला. 

हेही वाचा : खासदार लग्नात नाचताना फिट अन् घरी कोरोना लस घेण्यासाठी आजारी 

गृहनिर्माण मंत्र्यांनी अशा प्रकारे दबाव आणून पदाचा दुरुपयोग केला. माहिती अधिकार प्रावधानाचा त्यांनी भ्रष्टाचारासाठी दुरुपयोग केला. याबाबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश लोखंडे यांनी आपल्या क्षमतेची मर्यादा गृहनिर्माण मंत्र्यांकडे उपस्थित केली होती. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याविरुद्ध झालेल्या आरोपाचे त्रयस्थ संस्थेकडून चौकशी करण्यासाठी त्यांनी सुचविले. कलमे यांनी या कोरोना काळात एसआरएमध्ये सुमारे २०० माहिती अधिकार अर्ज केले आहेत. अशाच पद्धतीचे अर्ज हे म्हाडा आणि मुंबई महापालिकेतही करण्यात आले, असे सोमय्या यांनी सांगितले. 

अर्जदार प्रवीण कलमेचा उद्देश अपारदर्शक आहे. परंतु, त्या अर्जावर आव्हाडांनी ताबडतोब माहिती द्या असे आदेश देणे आणि यासाठी प्रशासनावर दबाव आणणे यामागील नेमका हेतू काय? अर्जदाराचे ३०० अर्ज पाहताना लक्षात येते की आव्हाड आणि कलमे यांची जोडी ही अनिल देशमुख आणि वाझे यांच्यासारखी आहे का? गृहनिर्माण मंत्री व एसआरएने या पूर्वी अशाच पद्धतीने डीएचएफएलचे ६०० कोटी रुपये कर्ज असलेले चेंबूरचे एसआरए प्रकल्प ईडीची जप्ती असतानाही तिसऱ्या खाजगी एसआरए विकासकाच्या नावाने करण्याचे साहस केले होते. ईडीने यासंदर्भात एसआरए च्या काही अधिकाऱ्यांची चौकशीही सुरु केल्याचे कळत आहे,  असेही सोमय्यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख