मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका तरूणीने बलात्काराची तक्रार पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे धाव घेत कारवाईची मागणी करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना धमक्यांचे कॉल येऊ लागले आहेत. त्यांनी या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाच आव्हान दिलं आहे.
धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी खुलासा केला होता. तक्रारदार तरुणीच्या बहिणीशी माझे संबंध होते आणि मला तिच्यापासून दोन मुले आहे, असे मुंडेंनी स्पष्ट केले होते. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला होता. मुंडे यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी केली होती. तसेत, मुंडेंच्या विरोधात तक्रार करणाऱ्या तरुणीचीही सोमय्या यांनी भेट घेतली होती.
सोमय्या यांनी मुंडे यांच्याविरोधात आक्रमक पावले उचलल्यानंतर त्यांना आता धमक्यांचे कॉल येऊ लागले आहेत. त्यांनी या प्रकरणी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, धनंजय मुंडे यांचे प्रकरण बाहेर आल्यापासून मला धमक्यांचे कॉल येऊ लागले आहेत. याची पोलिसांनाही माहिती आहे. मी शरद पवारांना हे सांगू इच्छितो की त्यांनी हे थांबवावे. त्यांच्याच हिंमत असेल तर त्यांनी समोरून लढावे.
किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे मुंडेंच्या बाबत लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या तक्रारीवर निडवणूक आयोग काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सोमय्या यांनी निडवणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात पाच महत्त्वाचे मुद्दे नमूद करत मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत.
धनंजय मुंडे यांनी दुसरं लग्न केल्याचं सार्वजनिकरीत्या मान्य केलं आहे. दुसऱ्या पत्नीची आणि त्यांच्या मुलांची काळजी घेत असल्याचंही त्यांनी कबूल केलं आहे. याशिवाय त्यांची दुसरी पत्नीच्या बहिनिने मुंबई पोलीसांकडे मुंडेंविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे, असं किरीट सोमय्या यांनी पत्रात म्हटल आहे.
धनंजय मुंडे यांनी दुसऱ्या पत्नीसाठी मुंबईत फ्लॅट घेऊन दिल्याचंही मान्य केलंय. शिवाय मुलांना आपलं नाव दिल्याचीही कबुली त्यांनी दिली आहे. पण ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी धनंजय मुंडे यांनी आपल्या शपथपत्रात दुसऱ्या विवाहाची माहिती लपवली होती. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेऊन आपण योग्य ती कारवाई करावी, असं सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
Edited by Sanjay Jadhav

