'त्या' पंधरा लाखांचा हिशेब मागणाऱ्यांवर जोतिरादित्य शिंदे भडकले अन् म्हणाले...

प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याच्या आश्वासनावरुन विरोधी पक्षांनी भाजपची आज कोंडी केली.
bjp leader jotiraditya scindia slams congress party members in rajya sabha
bjp leader jotiraditya scindia slams congress party members in rajya sabha

नवी दिल्ली : प्रत्येकाच्या बँक खात्यांत १५ लाख रूपये जमा करण्याच्या आश्वासनावरुन काँग्रेसच्या सदस्यांनी भाजपची आज कोंडी केली. यामुळे भाजप खासदार जोतिरादित्य शिंदे भडकले. तुम्ही १५ लाखांच्या गोष्टी तुम्ही करता, आधी मुंबईतील १०० कोटींचा हिशोब द्या, असा पलटवार शिंदेंनी केला. मला तोंड उघडायला भाग पाडू नका. अन्यथा मी बरेच बोलायला सुरू करेन, असा इशाराही त्यांनी दिला. 

राज्यसभेत आज सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील १०० कोटींच्या प्रकरणाचे पडसाद उमटले. अर्थविधेयकावरील चर्चेत भाजपच्या बाकांवरून बोलणारे शिंदे यांनी २००४-१४ या काळातील आकडे देण्यास सुरवात केली. यावर तुम्हीदेखील तेव्हा मंत्री होतात, असा चिमटा काँग्रेसचे जयराम रमेश, राजीव सातव या सदस्यांनी काढला. त्यामुळे शिंदे भडकले आणि म्हणाले, हो, मी मंत्री होतो हे मी नाकारत नाही. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीतून मिळणारा पैसा खर्च कोठे व कसा खर्च केला याबाबत मोदी सरकार व काँग्रेस सरकारच्या पद्धतीतील मोठी तफावत पाहा. किमतीवरील खर्च वजा जाता सध्या ६० टक्के राज्यांना व ४० टक्के केंद्र सरकारला मिळत आहे. त्यातही ६० टक्‍क्‍यांतील ४२ टक्के पैसा राज्यांकडे जात आहे. 

जोतिरादित्य शिंदे यांच्या भाषणात सदस्यांनी वारंवार अडथळे आणले. त्यावर राजीव सातव यांचे नाव घेऊन शिंदे म्हणाले की, राजीव, मला तोंड उघडायला भाग पाडू नका. महाराष्ट्रातील केवळ एका मंत्र्याकडून १०० कोटी घेतले जात होते. १५ लाखांच्या गोष्टी करताना आधी या १०० कोटींचा हिशोब द्या. ज्यांची घरे काचेची असतात त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत. 

नोटाबंदी व जीएसटीच्या घातक निर्णयांमुळे कोरोनाच्या आधीपासूनच देशाची आर्थिक स्थिती बिघडली होती. आता तर ती अतिदक्षता विभागात आहे, अशी टीका काँग्रेसचे दीपेंद्रसिंह हूडा यांनी केली. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे रूळावरून घसरलेली अर्थव्यवस्था कोरोनापूर्व काळातील स्थितीत येण्यासाठीच २०२५ हे वर्ष उजाडेल. आर्थिक अपयश लपवण्यासाठी कोरोनाच्या आड लपणे भाजप सरकारने बंद करावे, असेही त्यांनी नमूद केले. 

गेले चार महिने दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात. आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या ३०० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू पुसण्याची संवेदनशीलता सरकारने आता दाखवावी, अशी विनवणी हूडा यांनी हात जोडून सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com