जोतिरादित्य शिंदे म्हणतात, होय मी कुत्राच आहे पण... - bjp leader jotiraditya scindia says yes i am dog because i am the servant of people | Politics Marathi News - Sarkarnama

जोतिरादित्य शिंदे म्हणतात, होय मी कुत्राच आहे पण...

वृत्तसंस्था
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

मध्य प्रदेशात मिनी विधानसभा ठरणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यामुळे प्रचारासह नेत्यांच्या चिखलफेकीलाही जोर आला आहे.  

भोपाळ : मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांचा प्रचार शिगेला पोचला आहे. सत्ताधारी भाजप विरुद्ध काँग्रेस असा जोरदार सामना रंगला आहे. काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजप नेते जोतिरादित्य शिंदे यांना कुत्रा म्हटले होते. याला आता शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण आता पुन्हा तापू लागले आहे. राज्यात 28 विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला पोटनिवडणुका होत आहे. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली आहे. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून ते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.  

जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. यातील तब्बल 16 ग्वाल्हेर भागातील आहेत. शिंदे यांच्या ग्वाल्हेर या बालेकिल्ल्यात कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले होते. 

कमलनाथ यांच्यासोबत काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनीही सरकारविरोधात हल्लाबोल सुरू केला आहे. दोन्ही नेत्यांकडून मुख्यमंत्री चौहान यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. यामुळे भाजप नेत्यांकडून कमलनाथ आणि दिग्विजयसिंह यांना लक्ष्य केले जात आहे.  राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपला केवळ 9 जागा हव्या आहेत. काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी पोटनिवडणुकीतील सगळ्या जागा जिंकाव्या लागतील. यानंतर राजकीय समीकरणे बदलू शकतात.

जोतिरादित्य शिंदे यांच्यावर आता मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. कारण त्यांच्यासोबत काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या 22 आमदारांना पुन्हा निवडून आणण्याची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर आहे. काँग्रेसकडून सातत्याने शिंदे यांना लक्ष्य केले जात आहे. त्यांना गद्दार, विकले गेलेले अशी शेलकी विशेषणे वापरली जात आहेत. कमलनाथ यांनी तर शिंदे यांची तुलना कुत्र्याशी केली होती. 

जोतिरादित्य शिंदे यांनी या टीकेला आज जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले की, कमलनाथजी मला कुत्रा म्हणतात. होय, मी कुत्रा आहे कारण मी जनतेचा सेवक आहे. कुत्रा हा मालकाचे रक्षण करतो. कोणी भ्रष्टाचारी आणि चुकीची धोरणे आणल्यास हा कुत्रा त्यांच्यावर हल्ला करेल. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख