कमलनाथांनी अखेर इमरती देवींना पाडलंच..! - bjp leader imrati devi loses from dabra constituency from madhya pradesh | Politics Marathi News - Sarkarnama

कमलनाथांनी अखेर इमरती देवींना पाडलंच..!

वृत्तसंस्था
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत कमलनाथ यांनी आयटम म्हणून हिणवल्याने चर्चेत आलेल्या इमरती देवी या पराभूत झाल्या आहेत. 

भोपाळ : मध्य प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकीतील 28 जागांपैकी भाजपला 19 तर काँग्रेसला 9 जागा मिळाल्या आहेत. भाजपला मोठा विजय मिळाला असला तरी माजी मंत्री आणि भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांना पराभवाचा धक्का बसला आहे. इमरती देवींना त्यांचेच नातेवाईक सुरेश राजे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. काँग्रेस नेते कमलनाथ यांनी इमरती देवींना 'आयटम' संबोधल्याने मोठा गदारोळ उडाला होता. 

इमरती देवी डबरा विधानसभा मतदारसंघात उभ्या होत्या. इमरती देवी यांना पराभूत करणारे सुरेश राजे हे काँग्रेसचे उमेदवार असून, ते त्यांचे व्याही आहेत. कमलनाथ यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर इमरती देवी चर्चेत आल्या होत्या. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. कमलनाथ यांनी आयटम असे संबोधल्यानंतर इमरती देवींनी प्रत्युत्तर म्हणून कमलनाथांची तुलना भंगारवाल्याशी केली होती.

सुरेश राजे यांनी इमरती देवी यांना ७ हजार ६३३ मतांनी पराभूत केले. इमरती देवी यांना ६८ हजार ५६ मते तर सुरेश राजे यांना ७५ हजार ६८९ मते मिळाली. बहुजन समाज पक्षाचे उमेदवार संतोष गौड यांना ४ हजार ८८३ मते मिळाली. इमरती देवी या काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झाल्या होत्या. 

मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला पोटनिवडणुका झाल्या. जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत 25 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता हे सर्व आमदार भाजपच्या तिकिटावर उभे होते, तीन मतदारसंघात विद्यमान आमदारांचे निधन झाल्याने पोटनिवडणुका झाल्या. 

एक्झिट पोलनुसार, भाजपला 28 पैकी 17 जागा आणि काँग्रेसला 11 जागा मिळतील, असा अंदाज होता. या निवडणुकीत जोतिरादित्य शिंदे यांचा समर्थक आमदारांना फटका बसेल, अशीही शक्यता होती. परंतु, भाजपने या पोटनिवडणुकांत मोठा विजय मिळवला आहे. राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपला केवळ 8 जागा हव्या होत्या. काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी पोटनिवडणुकीतील सगळ्या जागा जिंकाव्या लागणार होत्या. यानंतर राजकीय समीकरणे बदलू शकत होती. 

या पोटनिवडणुकांमुळे मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण तापले होते. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली होती. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्नही कमलनाथ यांनी या निवडणुकीत केला होता.  

Edited by Sanjay Jadhav  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख