रावसाहेब दानवेंनंतर आता गिरीश महाजनांची भविष्यवाणी - bjp leader girish mahajan says mva government in state will fall soon | Politics Marathi News - Sarkarnama

रावसाहेब दानवेंनंतर आता गिरीश महाजनांची भविष्यवाणी

कैलास शिंदे
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरुन मोठा गदारोळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन राज्यातील सरकारबाबत भविष्यवाणी केली आहे. 

जळगाव : सक्त वसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) राज्यातील सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर कारवाई केल्यास सरकार पाडण्यासाठी हा केंद्रातील भाजपचा डाव असल्याचा आरोप सत्ताधारी करीत असतात. त्यांनी चुका केल्या असतील तरी केंद्रांने कारवाई करायचीच नाही का, असा सवाल भाजपचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज केला. राज्यातील सरकारमध्ये फार काही आलबेल नाही, ते पाच वर्षे पूर्ण करणार नाही, लवकरच त्यांच्या कर्माने सरकार पडणारच, अशी भविष्यवाणीही महाजन यांनी केली. 

शिवसेनेचे नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर राज्यातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्रांवर आरोप केला आहे. राज्यात सत्ता अस्थिर करण्यासाठी भाजपचा हा डाव असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या आरोपाला उत्तर देतांना गिरीश महाजन म्हणाले की, सध्या  सीबीआय, ईडी यांनी राज्यात सत्ताधारी पक्षातील कोणावरही  कारवाई केली तर केंद्रांने राज्यातील सरकारवर दबाव आणण्यासाठी कारवाई केली असा सर्रास आरोप राज्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षाकडून होत आहे. कोणतीही कारवाई झाली की यांना उठसूठ केंद्रातील भाजपचे सरकार दिसत असते. 

भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी दोन महिन्यात सरकार पडणार असे म्हटले आणि लगेच सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई झाली. त्यामुळे केंद्रांतील भाजपवर शंका उपस्थित करण्यात येत असल्याचा आरोपही सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केला आहे. वास्तविक दानवे यांच्या बोलण्याचा आणि  राज्यातील ईडीच्या कारवाईचा कोणताही संबध नाही. तसेच राज्यातील सरकार पाडण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार असे काहीही करीत नाही. सत्ताधारी पक्षातील लोकांनी चुका केल्या असतील, तर त्यांच्यावर संबधित संस्थानी कारवाई करायाची नाही काय? त्यांनी चुका केल्या नसतील त्यांनी घाबराचीही काही गरज नाही. परंतु उगाच केंद्रातील भाजप सरकारच्य नावाने शंख करणे बंद करावे, असा टोलाही महाजन यांनी लगावला. 

राज्यातील सरकार पाडण्यासाठी भाजप काहीही करणार नाही आणि करीतही नाही, असे सांगून महाजन म्हणाले की,  तीन पक्षांचे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कसे चालले आहे, हे राज्यातील जनता पाहत आहे. त्यांच्यात कोणताही ताळमेळ दिसत नाही. कोणत्याही प्रश्‍नावर या तीन पक्षातील मंत्र्याचे आणि नेत्यांचेही एकमत नाही. त्यामुळे हे सरकार कोणत्याही परिस्थितीत पाच वर्षे पूर्ण करणार नाही, हे निश्‍चित पडणारच आहे, मात्र त्यांच्या कर्मानेच ते पडले हे निश्‍चित आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख