दोन्हीकडे एकच वकील कसा? फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा - bjp leader devendra targets shivsena over sushant singh rajput case | Politics Marathi News - Sarkarnama

दोन्हीकडे एकच वकील कसा? फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा

वृत्तसंस्था
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूचा तपास राष्ट्रीय पातळीवरील तीन यंत्रणा करीत आहेत. मात्र, यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी मात्र, सुरूच आहेत. 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुरू केला आहे. सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी, स्वयंपाकी नीरजसिंह यांच्यासोबत  चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर यांची सीबीआयने चौकशी केली होती. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिची सीबीआयने काल दहा तास चौकशी केली होती. आज पुन्हा सकाळी 10.30 वाजल्यापासून तिची चौकशी सुरू होणार आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता शिवसेनेला लक्ष्य केले आहे. 

सुशांतच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी सीबीआयचे 15 जणांचे पथक मुंबईत 20 ऑगस्टला दाखल झाले आहे. सीबीआयचे पथक संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) गेस्ट हाऊसवर थांबले आहे. सीबीआय पथकाने चौकशी सुरू केली आहे. सीबीआय पथकाने पथकाने मुंबईचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांची भेट घेतली होती. या प्रकरणाशी निगडित कागदपत्रे सीबीआयने मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतली आहेत. सीबीआयने सुशांतचे शवविच्छेदन करणाऱ्या कूपर रुग्णालयातील डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. 

हे ही वाचा : आठवले म्हणतात, सुशांतची आत्महत्या नव्हे खूनच...!

सुशांतच्या मृत्यू झाला त्यावेळी 14 जूनला घरात उपस्थित असलेल्यांमध्ये सिद्धार्थ पिठाणी आणि नीरज यांचा समावेश होता. सिद्धार्थ आणि नीरज या दोघांची सीबीआयने आधी चौकशी केली आहे. याचबरोबर सुशांतचा चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर यांचीही चौकशी करण्यात आली. सुशांतकडे घरकाम करणाऱ्या दीपेश सावंत यांचीही चौकशी सीबीआयने केली होती. काल सीबीआयने रियाचा भाऊ शोविक याची आठ तास चौकशी करुन त्याचा जबाब  नोंदवला होता. 

हे ही वाचा : सिद्धार्थ पिठाणी, सॅम्युएल मिरांडा यांच्यासमोरच रियाची चौकशी 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया चक्रवर्ती हिची आज सीबीआयने चौकशी सुरू केली. सकाळी 10.30 वाजता चौकशीसाठी आलेली रिया रात्री नऊ वाजता तेथून बाहेर पडली. याचबरोबर सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी आणि व्यवस्थापक सॅम्युएल मिरांडा यांचीही चौकशी करण्यात आली. काही वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, रिया हिला सीबीआयने पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले आहे. रिया ही सुशांतच्या घरातून 8 जूनला बाहेर पडली होती. सुशांतशी संबंध तोडण्याचे कारण स्पष्टपणे सांगू शकली नाही. यामुळे पुन्हा एकदा तिची चौकशी करण्यात येत आहे. 

हे ही वाचा : नेटिझन्स उतरले रिंगणात 

विरोधी पक्षांकडून या प्रकरणी शिवसेनेच्या युवा नेत्याच्या नावाचा उल्लेख करण्यात येत आहे. यावरुन पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरवर जाब विचारला होता. त्यांनी म्हटले होते की, देवेंद्र फडणवीस असा दावा करतात की कोणत्याही भाजप नेत्याने सुशांतच्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे घेतलेले नाही. मग नारायण राणे यांच्यासारखे भाजप नेते युवा मंत्री असा उल्लेख का करीत आहेत? आता का माघार घेत आहात? आता तुम्ही माफी मागण्याचे पाऊल उचलणार का? 

याला फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, राजदीप कालपर्यंत तुम्ही सुशांत प्रकरणातील आरोपींची वकिली करीत होतात आणि शिवसेनेची करीत आहात. अशा प्रकारचे वर्तन केवळ संशयाचे वातावरण निर्माण करते. दोघांना एकच वकील का लागत आहे. काळजी करु नका सत्य जिंकेल. सत्यमेव जयते! 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघर हत्याकांड प्रकरणी शिवसेनेने विशेष वकील म्हणून सतिश मानेशिंदे यांची नियुक्ती केली आहे. सुशांत प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्ती हिचे वकीलही मानेशिंदे हेच आहेत. यावरुन फडणवीस यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख