मुंडेंना ऑफर देणाऱ्या खोतकरांना विचारतंय कोण? फडणवीसांनी उडवली खिल्ली

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाला रामराम केला आहे. यावरुन जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
bjp leader devendra fadnavis targets shivsena leader arjun khotkar
bjp leader devendra fadnavis targets shivsena leader arjun khotkar

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला रामराम केला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अनेक नेत्यांवर अन्याय होत असल्याची चर्चा आहे. यात पंकजा मुंडे यांचेही नाव घेतले जाते. यामुळे  माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिली आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोतकरांना टोला लगावला आहे. 

खडसे यांनी राजीनामा दिल्याने भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पक्षात काही नेत्यांवर अन्याय होत असल्याची चर्चा सुरू होती. खडसे यांच्या राजीनाम्याने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यावरही पक्षात अन्याय होत असल्याची चर्चा मागील काही काळापासून सुरू आहे. त्या पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याचेही अनेक वेळा समोर आले होते. 

या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावे, असे खुले आमंत्रण शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी दिले आहे. यावर पंकजा काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, खोतकरांच्या ऑफरची देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्या अर्जुन खोतकरांना कोण विचारतय? ते कसली ऑफर देत आहेत?  

खडसे यांच्या राजीनाम्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, खडसे यांनी पक्ष सोडला याचे मला खूप दुःख झाले आहे. त्यांनी पक्ष सोडायला नको होता. त्यांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत, ते अर्धसत्य आहे. त्यावर मी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही, मला काही बोलायचं नाही. योग्य वेळ आली की बोलेन. कसं असतं पक्ष सोडण्यासारखा निर्णय घ्यायचा असेल, तेव्हा कुणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं, त्यांनी मला ठरवलंय.

खडसेंवर काय आरोप होते, ती केस काय होती, तीन-तीन दिवस प्रसार माध्यमांनी देखील ते प्रकरण लावून धरलं होतं. त्यामुळे यावर मी अधिक बोलणार नाही. एवढेच सांगतो, की खडसे जे सांगतायेत ते अर्धसत्य आहे. पुर्ण सत्य योग्य वेळ आल्यावर मी सांगेन, सध्या मात्र मला त्याबद्दल काहीच बोलायचे नाही, असेही  फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

जळगाव जिल्ह्यात खडसेंच्या जाण्याने पक्षावर काय फरक पडेल, म्हणाल तर कुठलाही पक्ष हा मोठाच असतो, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या जोरावर तो मोठा झालेला असतो. जळगाव जिल्हा मुळातच भाजपचा गड आहे. तो खडसेच्या जाण्यानंतरही कायम राहील, असेही फडणवीस यांनी सांगितले. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com