कंगना राणावतचा वाद...देवेंद्र फडणवीस अन् बनाना रिपब्लिक... - bjp leader devendra fadnavis said centre is right in providing security to kangana ranaut | Politics Marathi News - Sarkarnama

कंगना राणावतचा वाद...देवेंद्र फडणवीस अन् बनाना रिपब्लिक...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्रात वातावरण तापले आहे. यातच केंद्र सरकारने आता तिला 'वाय' दर्जाची सुरक्षा दिली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. 

मुंबई : मुंबई पाकव्याप्त काश्‍मीर झाल्यासारखी वाटते, असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावत हिने केले होते. यामुळे महाराष्ट्रात कंगनाच्या विरोधात वातावरण तापले आहे. शिवसेनेने तर कंगनाने महाराष्ट्रात येऊन दाखवावे, असे आव्हान दिले आहे. आता केंद्रातील भाजप सरकारने तत्परतेने कंगनाला 'वाय' दर्जाची सुरक्षा दिली आहे. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वपक्षीय निषेधाची मागणी केली आहे. याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले असून, केंद्र सरकारचे समर्थन केले आहे. 

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्‍मीरशी करून कंगनाने मुंबईकरांसह राज्यातील जनतेचा रोष ओढवून घेतला आहे. राज्य सरकारमधील सर्वच नेते तिच्या वक्तव्याचा निषेध करून आता तिने मुंबईत राहू नये, असा सल्ला देत आहेत. कंगना राणावतचे मुंबईबाबतचे वक्तव्य हा विषय आता चांगलाच पेटला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष असे चित्र या मुद्द्यावर तयार होऊ लागले आहे. कंगनाने आता हरियानातच जाऊन रहावे, असा सल्ला तिला संतप्त मुंबईकर आणि महाराष्ट्रातील नागरिक देत आहे. शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत कंगनाला मुंबईत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा दिला आहे. 

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते की, मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला केंद्र सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा दिली जाते हे आश्चर्यकारक आणि दु:खदायीही आहे. महाराष्ट्र हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना अथवा काँग्रेसचा नाही तर तो भाजप आणि राज्यातील जनतेचा आहे. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचा निषेध करण्यासाठी आता तरी सर्व पक्षातील नेत्यांनी पुढे यावे. 

यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, कायदा सर्वांनी पाळणे गरजेचे आहे. तुम्हाला कोणाचे मत आवडत नसेल तर तुम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करु शकता. परंतु, अशा व्यक्तींचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्यघटनेची शपथ घेतलेल्यांवर आहे. त्यामुळे या प्रकरणी केंद्र सरकारने योग्य निर्णय घेतला आहे. तिचे वक्तव्य चुकीचे असेल तर निषेध करावा. 

कोणी काही चुकीचे बोलले, त्याची विचारसरणी चुकीची असेल तर आपल्याला आक्षेप घेता येतो. मात्र, अशा व्यक्तींचे आयुष्य आणि मालमत्ता यांचे संरक्षण करणे ही राज्य सरकार आणि घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींची जबाबदारी आहे. असे घडत नसेल तर आपण 'बनाना रिपब्लिक' (अराजक माजलेला देश) होऊ, असे फडणवीस यांनी सांगितले. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख