बिहारमधील लिटमस टेस्ट ठरवेल फडणवीसांचा राष्ट्रीय राजकारणातील प्रवेश - bjp leader devendra fadanvis will be appointed as bihar incharge | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारमधील लिटमस टेस्ट ठरवेल फडणवीसांचा राष्ट्रीय राजकारणातील प्रवेश

मंगेश वैशंपायन
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आता राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने पावले पडू लागली आहेत. भाजपने त्यांच्यावर बिहारची जबाबदारी सोपवून त्यांची एकप्रकारे परीक्षाच घेण्यास सुरूवात केली आहे. 
 

नवी दिल्ली : आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सत्तारूढ भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून महाराष्टाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर महत्वाची जबाबदारी देण्याचे निश्‍चित झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी भाजप आघाडी बिहार निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा म्हणून तापविणार असल्याचे संकेत आहेत. फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारणात आणण्याची लिटमस टेस्ट भाजपकडून बिहारमध्ये घेतली जाणार आहे. 

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या हा बिहारच्या निवडणुकीतील मुख्य प्रचार मुद्दा बनणार हे लक्षात आल्यावर दिल्लीतील भाजप नेतृत्वाने फडणवीस यांना कळीची जबाबदारी देण्याचे ठरविले. त्या प्रकरणाच्या तपासातील मुंबई पोलिसांची भूमिका व राज्यातील काही मंत्र्यांवर होणारे आरोप या पार्श्‍वभूमीवर भाजप आघाडीने बिहारमध्ये तो निवडणूक मुद्दा करण्याचे निश्‍चित केले आहे. त्याच पार्श्‍वभूीवर फडणवीस यांना बिहार प्रभारी नेमण्यात आले आहे. 

2015 च्या निवडणुकीत भाजप प्रभारी दिवंगत अनंतकुमार यांचे मदतनीस राहिलेले केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडेही बिहारची जबाबदारी राहणार आहे. फडणवीस हे त्यांच्याबरोबर काम करतील, असे सूत्रांनी सांगितले. फडणवीस व प्रधान या जोडगोळीने महाराष्ट्रातही भाजपला चांगले यश मिळवून दिले होते. तीच जोडी बिहारमध्येही भाजपला पुन्हा सत्तेपर्यंत नेईल, असा पक्षनेतृत्वाला विश्‍वास वाटतो.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात फडणवीस यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर सतत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह उपमुख्यमंत्री सुशील मोदी, खासदार चिराग पासवान व भाजप आघाडीच्या अन्य नेत्यांशीही फडणवीस यांचे उत्तम संबंध आहेत. 

नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या नेतृत्वाने फडणवीस यांच्यावर महाराष्ट्राची एकहाती जबाबदारी टाकली आहे. विशेषतः फडणवीस हे मोदी यांच्या गुड बुक्‍समधील नेते मानले जातात. भाजपची केंद्रीय पक्षसंघटना व मोदी मंत्रिमंडळातील 65 च्या आसपासच्या व त्यापुढच्या नेत्यांना पक्षाने वानप्रस्थाश्रमाचे संकेत देण्यास सुरवात केली आहे. विविध राज्यांतील तरूण नेत्यांना राष्ट्रीय पातळीवर आणण्याच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. अनुराग ठाकूर, कपिल मिश्रा, आकाश विजयवर्गीय आदी नेत्यांना अच्छे दिन येण्याचे स्पष्ट आहे. दुसरीकडे समतोल राखण्यासाठी फडणवीस व पंकजा मुंडे यांच्यासारख्या संयमी नेतृत्वाला दिल्ली दरबारात आणण्यासाठी हालचाली सुरू आहेत. खुद्द फडणवीस यांची राष्ट्रीय पातळीवरील ही पहिली चाचणी ठरणार आहे. 

बिहारच्या राजकारणात महाराष्ट्राच्या मोजक्‍याच नेत्यांनी आतापर्यंत ठसा उमटविला आहे. बिहारमधील प्रथम क्रमांकाचा रस्ता, जेथे पाटण्यात राज्याचे मुखयमंत्री निवासस्थान आहे (1 अणे मार्ग) त्याला लोकनायक बापूजी अणे यांचे नाव देण्यात आले आहे. यापूर्वी बिहारी राजकारणात आपला ठसा उमटविणारे मधू लिमये, मुकूल वासनिक व जॉर्ज फर्नांडिस यांच्या पंक्तीत बसण्याचा मान फडणवीस यांना मिळणार आहे. बहुतांश मराठी खासदार, नेत्यांचे हिंदी उच्चारण हा उत्तर भारतात कुचेष्टेचा विषय ठरतो. मात्र, नागपूरचे रहिवासी असलेले फडणवीस यांची हिंदीवरही मजबूत पकड असल्याचे दिल्ली निवडणूक प्रचारावेळीच पक्षनेतृत्वाने हेरले होते. दिल्लीतील पूर्वांचली भागातील सभांत तर फडणवीस यांनी अक्षरशः बिहारी-भोजपुरी ढंगात भाषणे केली होती त्याची आठवण आजही भाजप मुख्यालयातील नेते सांगतात.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख