मंदिरे खुली केल्यास सरकारचा पाठिंबा काँग्रेस-राष्ट्रवादी काढून घेणार का? - bjp leader chandrakant patil targets chief minister uddhav thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

मंदिरे खुली केल्यास सरकारचा पाठिंबा काँग्रेस-राष्ट्रवादी काढून घेणार का?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

राज्यातील प्रार्थनास्थळे उघडण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आमनेसामने आले आहेत. या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले आहे. 

मुंबई : राज्यातील प्रार्थनास्थळे उघडण्याच्या मुद्द्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात नवा वाद पेटला आहे. मंदिरे उघडण्याबाबत राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरे यांनी तेवढ्याच कडक भाषेत प्रत्युत्तर दिले होते. आता या वादात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उडी घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना धारेवर धरले आहे. 

राज्यातील प्रार्थनास्थळे सुरु करण्याबाबत राज्यपाल कोश्यारी यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विचारणा केली होती. 'तुम्ही तुमचे हिंदुत्व विसरलात की पूर्वी नावडता असलेला 'सेक्युलर' शब्द अचानक आवडायला लागला, असा खोचक सवाल राज्यपालांनी या पत्रात विचारला होता. कोरोनाच्या संकटाशी लढताना तुम्हाला काही दैवी संकेत मिळतात का, अशीही विचारणा राज्यपालांनी केली होती. 

याला ठाकरे यांनी पत्राद्वारे उत्तर दिले होते. त्यांनी पत्रात म्हटले होते की, आपले प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. याबद्दल सरकार जरूर विचार करत आहे.जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जिवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे. म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाउन करणे चुकीचे तसेच, तो एकदम उठवणेही अयोग्यच. कोरोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सध्या राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम राबवली जात आहे.  

आपल्या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे, तो योग्यच आहे. मात्र, माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच, ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे 'सेक्युलर' असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ  ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा 'सेक्युलरिझम' आहे तो आपल्याला मान्य नाही का, असा सवालही उद्धव यांनी केला आहे.  

आपण म्हणता की गेल्या ३ महिन्यांत काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. ही तिन्ही पत्रे भाजपच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल ही खात्री मी आपल्याला देतो, असे ठाकरे यांनी नमूद केले आहे. 

राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केले. ते म्हणाले की, राज्यपाल हे नागरिक नाहीत की हिंदू नाहीत? सर्व मुद्द्यांवर बोलण्याचा राज्यपालांना अधिकार आहे. त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही का? मंदिरे खुली करण्यात तुम्हाला नेमकी अडचण काय आहे? तुम्ही मंदिरे खुली केल्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारचा पाठिंबा काढणार आहेत का? 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख