चंद्रकांत पाटील म्हणतात, कोण सुरेश जाधव मी ओळखत नाही..मला फक्त मोदीच माहिती - bjp leader chandrakant patil slams sii executive director suresh jadhav | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांत पाटील म्हणतात, कोण सुरेश जाधव मी ओळखत नाही..मला फक्त मोदीच माहिती

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 मे 2021

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. परंतु, देशात लशीची टंचाई असल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. 

मुंबई : देशात कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. परंतु, देशात लशीची टंचाई असल्याने लसीकरणाचा (Covid Vaccination) वेग मंदावला आहे. यामुळे जगातील आघाडीची लस उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला (SII) लक्ष्य केले जात होते. या पार्श्वभूमीवर 'सिरम'चे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी या प्रकरणी केंद्र सरकारची धोरणे जबाबदार असल्याचा दावा केला होता. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, कोण सुरेश जाधव मी ओळखत नाही. मला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी माहिती आहेत. मोदी जे म्हणतात ते करतात. त्यांनी सर्वांच्या लसीकरणाचे डिसेंबरपर्यंत नियोजन केलं आहे.  लशीचे उत्पादन कसं वाढेल, त्याला सप्टेंबरपासून वेग मिळेल याचा विचार त्यांनी केला आहे. डिसेंबरपर्यंत देशाची गरज आपण पूर्ण करू हे मोदी म्हणतात यावर देशातील नागरिकांचा विश्वास आहे. हे जाधव कोण मला माहिती नाही. 

पुणे महापालिकेच्या हातात लस नाही. लसीकरणाला लोकं पैसे देतील मात्र विकत कुठून द्यायची. पुणे महापालिकेने आणखी एक 200 बेडचे हॉस्पिटल सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी मी एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे ते आठ दिवसांत सुरू होणार आहे, असे पाटील यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर बोलताना पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे हे माझे दुश्मन नाहीत. त्यांनी आठ दिवस जाऊन तिथे राहावे. तिकडे चांगलं वातावरण आहे. हातात काठी घेतल्याशिवाय प्रशासन काम करत नाही. आता महाराष्ट्रात संजय राऊत यांच्यानंतर अजित पवारांना विचारण्याचा आणि मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे. मात्र, सौ चूहे खाकर बिल्ली चली हाज को, अशी अवस्था आहे. अजित पवारांनी उद्धव ठाकरेंनाही सल्ला द्यावा. तीन तासांत पाहणी होत नाही. अजित दादांनी आठ दिवस कोकणात जावे आणि त्यांच्या स्टाईलने पंचनामे करून घ्यावेत.  

हेही वाचा : यामुळेच लस टंचाईला केंद्र जबाबदार; सिरमच्या कार्यकारी संचालकांनी सांगितली कारणे 

देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत असताना आता लशीच्या टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना लसीकरण खुले केल्यानंतर नेमकी लशीची कमतरता जाणवत आहे. यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी केवळ औपचारिकरीत्या ही मोहीम सुरू ठेवली आहे. वेळीच नागरिकांचे लसीकरण न झाल्यास कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

18 वर्षांवरील व्यक्ती 1 मेपासून कोरोना लस घेण्यास पात्र आहेत. ते सरकारच्या को-विन प्लॅटफॉर्मवर आता नाव नोंदवू शकतात. नाव नोंदवल्यानंतर ते लसीकरण केंद्रावर जाऊन नियोजित वेळी लस घेऊ शकतात. केंद्र सरकारने सर्वांना लस देण्याची घोषणा केली आहे. कोरोना विरोधात लढण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख