चंद्रकांत पाटील म्हणतात, मला कोणाचाच राजीनामा मिळाला नाही! - bjp leader chadrakant patil says i havent received resignation of any party leader | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांत पाटील म्हणतात, मला कोणाचाच राजीनामा मिळाला नाही!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू होती. यावर आता चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला आहे. 

मुंबई : मला अद्याप पक्षाच्या कोणाही ज्येष्ठ अथवा कनिष्ठ नेत्याचे राजीनामापत्र मिळालेले नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे असे काही करतील असे मला वाटत नाही, असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरु होती. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी हा खुलासा केला आहे. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोणाला पक्ष सोडायचा असेल त्याने पक्षाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने माझ्याकडेच राजीनामापत्र पाठवायला हवे. माझ्याकडे अद्याप कोणाचेही राजीनामापत्र आले नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्ष सोडतील असे मला वाटत नाही नाही. ते पक्षाचे नुकसान होईल असे पाऊल उचलणार नाहीत.

दरम्यान, आज 'सरकारनामा'शी बोलताना खडसे यांनी, मी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही, असे स्पष्ट केले. खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे. यासाठी त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. खडसे यांनी मात्र, राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त 'सरकारनामा'ने दिले होते. याबाबत 'सरकारनामा'शी बोलताना खडसे म्हणाले की, मी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. मी जे करतो ते कधीही लपवत नाही आणि रोखठोक करतो. पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असता तर मी ते स्वतः जाहीरपणे सांगितले असते. असा कोणताही राजीनामा मी दिलेला नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माझ्या प्रवेशाचे मुहूर्त मी कधीच जाहीर केले नाहीत. हे सर्व मुहूर्त माध्यमांनी काढले आहेत.असे जर काही असेल तर मी स्वतः जाहीरपणे बोलेन, असेही खडसे यांनी स्पष्ट केले. 

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. अखेर खडसे यांनी भाजपच्या सदत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश गुरुवारी (ता.22) निश्चित झाला असल्याची माहितीही त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली होती.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची मागील काही काळापासून चर्चा सुरू आहे. त्याबाबत अनेक मुहूर्त सांगण्यात आले. मात्र, हे मुहूर्त आपण दिले नसल्याचे सांगून खडसे यांनी स्पष्ट नकार दिला होता. आता त्यांच्याच निकटवर्तीयांनी गुरुवारी (ता.22)  खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते.

Edited by Sanjay Jadhav 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख