नाईट लाईफच्या 'पुरस्कर्त्यांनी' सुशांतचा बळी घेतला : आशिष शेलार यांचा आरोप - BJP Leader Ashish Shelar Targets Aditya Thackeray in Sushantsinh Case | Politics Marathi News - Sarkarnama

नाईट लाईफच्या 'पुरस्कर्त्यांनी' सुशांतचा बळी घेतला : आशिष शेलार यांचा आरोप

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरुन भाजपचे नेते पर्यावरण मंत्री व युवा नेते आदित्य ठाकरे यांना टार्गेट करत आहेत. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा आदित्य यांच्यावर निशाणा साधला आहे

मुंबई : ''मुंबईच्या नाईटलाईफ संस्कृतीचे पुरस्कर्ते तसेच "ड्रग- पब-अँड पार्टी" गँगने सुशांत सिंह रजपूतचा बळी घेतला! या "ड्रग-पब-पार्टी" टोळीचे सदस्य कोण आहेत? त्यांचे संरक्षण कोण करीत आहे? मुंबई पोलिसांच्या तपासाची दिशा कोणी बदलली? #ED #CBI सत्य समोर आणते आहे! खरे चेहरे ही समोर येतीलच!! न्याय होईल!,'' अशा शब्दात भाजप आमदार व पक्षाचे मुख्य प्रतोद अॅड. आशिष शेलार यांनी पर्यावरण मंत्री व युवा नेते आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. 

काही दिवसांपूर्वी शेलार यांनी आपल्या ट्वीटद्वारे काही प्रश्न उपस्थित केले होते. ''कुणी,मुंबई पोलिसांना बोलू दिले नाही? पोलिसांचे हात कायद्याने बांधलेले असतात,पण सुशांतच्या केसमध्ये अन्य कोणी पोलिसांचे हात बांधले होते का? सर्वोच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे दिला. याप्रकरणी आमच्या मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का?," असे शेलार यांनी ट्वीटद्वारे म्हटले होते. 

"पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही!  "सिंघम" चा हा डायलॉग शंभर टक्के खरा आहे.  पण सुशांत सिंग रजपूतच्या केसमध्ये मुंबई पोलिसांनी का ठरवले नाही?  कुणी त्यांना ठरवू दिले नाही? कुणी त्यांना त्यांच्या नाव-लौकिक,ख्यातीप्रमाणे काम करु दिले नाही?,'' असेही प्रश्न शेलार यांनी उपस्थित केले होते.

दरम्यान, भाजपचे नेते अतुल भातखळकर हे देखील आदित्य यांच्यावर या प्रकरणात निशाणा साधत आहेत. गेल्या काही दिवसात मुंबईच्या पोलिस आयुक्तांना आदित्य ठाकरे भेटले अशीही चर्चा आहे. या चर्चेच्या दरम्यान त्यांनी ही सखोल तपासाची माहिती आपणहून घेतली का पोलिस आयुक्तांनी त्यांना दिली याचाही त्यांनी खुलासा करावा, असे भातखळकर यांनी म्हटले होते. कुठल्याही फौजदारी प्रकरणाची माहिती, आरोपपत्र दाखल होईपर्यन्त तपास अधिकारी कोणालाही देऊ शकत नाहीत, असे असताना पोलिस सखोल तपास करत आहेत हे ज्ञान ठाकरे यांना कुठून प्राप्त झाले, हे जनतेस कळणे आवश्यक आहे. याचा त्यांनी तातडीने खुलासा न केल्यास या संदर्भात योग्य ती कायदेशीर पावलं आपण उचलू असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख