शेतकऱ्यांचा पुळका असलेले पोलिसांबद्दल शब्दही बोलत नाहीत; स्मृती इराणी उतरल्या मैदानात - bjp leader and union minister smriti irani targets congress leader rahul gandhi | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांचा पुळका असलेले पोलिसांबद्दल शब्दही बोलत नाहीत; स्मृती इराणी उतरल्या मैदानात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी हिंसक वळण लागले होते. यावरुन विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला असून, याला उत्तर देण्यासाठी स्मृती इराणी मैदानात उतरल्या आहेत. 

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन दोन महिन्यांपासून सुरू आहे. या आंदोलनाला दिल्लीत प्रजासत्ताक दिनी हिंसक वळण लागले होते. आता या प्रकरणी सरकारडेच संशयाची सुई वळू लागली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. हे आंदोलन देशभरात पसरेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आता सरकारच्या वतीने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या मैदानात उतरल्या असून, त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाराचारानंतर सरकार आक्रमक झाले आहे. शेतकरी आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमा आणि गाझीपूर येथे पोलिस कारवाईमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कृषी कायदे आणि दिल्लीतील हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आज संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती अभिभाषणावर बहिष्कार टाकला. 

आज पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की,  कृषी कायदे हे बाजार व्यवस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व मिटवणारे आहेत. यामुळे देशातील तीन-चार उद्योगपती हवे तेवढे धान्य साठवून ठेवतील. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. या कायद्यांतर्गत शेतकऱ्यांना न्यायालयात दाद मागण्याची मुभा नाही. मोदी सरकार शेतकऱ्यांना मारायला निघाले आहे. 

कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. आता शेतकऱ्यांवरच हल्ले करून मोदी सरकार देशालाच दुबळे बनवत आहे. पंतप्रधान हे पाच उद्योगपतींसाठी काम करीत आहेत. या उद्योगपतींसाठीच नोटाबंदी व वस्तू व सेवा करांचे (जीएसटी) निर्णय झाले आणि त्यांच्यासाठीच कृषी कायदेही आणले आहेत. शेतकऱ्यांनी एक इंचही माघार घेण्याची गरज नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत. आंदोलन संपले या भ्रमात पंतप्रधान मोदींनी राहू नये आंदोलन शहरांमधून गावांपर्यंत पोचेल, असा इशाराही राहुल गांधींनी दिला आहे. 

यावरुन केंद्रीय स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर हल्ला चढवला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी हे हिंसाचाराला खतपाणी घालत आहेत. ते शेतकऱ्यांना हिसेंसाठी चिथावणी देत आहेत. ते शांतीचे आवाहन करण्याऐवजी अराजक माजवणाऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत. शेतकऱ्यांचा पुळका आलेले राहुल गांधी हिंसाचारात जखमी झालेल्या तीनशे पोलिसांबद्दल एकही शब्दही बोलत नाहीत. 

देशातील कायदा व सुव्यवस्था नष्ट व्हावी, अशी राहुल यांची इच्छा आहे. तिरंग्याचा अपमान करणारे आणि देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे ते समर्थन करीत आहेत. त्यांनी आता देशातील नागरिकांच्या विरोधातच युद्ध झेडले आहे, असा आरोप इराणींनी केला. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख