अमित शहांच्या रजनीकांत भेटीने बदलणार समीकरणे - bjp leader amit shah likely to meet superstar rajanikant | Politics Marathi News - Sarkarnama

अमित शहांच्या रजनीकांत भेटीने बदलणार समीकरणे

वृत्तसंस्था
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

तमिळनाडूत पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होत असून, आतापासूनच राज्यातील वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. 

नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाने आता तमिळनाडूकडे लक्ष वळविले आहे. तमिळनाडूतील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज चेन्नईत दाखल झाले आहेत. या दौऱ्यात शहा हे सुपरस्टार रजनीकांत यांची भेट घेण्याची दाट शक्यता आहे. भाजपच्या राज्यातील नेत्यांनीही याला दुजोरा दिला आहे. ही भेट झाल्यास राज्यातील समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलतील. 

शहा यांच्या तमिळनाडू दौऱ्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. विकास योजनांच्या उद्गाटनासाठी असलेल्या दौऱ्याची माहिती देताना स्वतः शहा यांनी संघटनात्मक कामासाठी चेन्नईला पोचलो, असे ट्‌विटरवर जाहीर केले आहे. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकचे भाजपशी चांगले संबंध होते. मात्र, मागील काही काळापासून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. केवळ नाईलाजाने अण्णाद्रमुक पक्ष केंद्रात भाजपबरोबर असल्याचे चित्र आहे. यामुळे नवीन पर्यायांची चाचपणी भाजपकडून सुरू आहे. 

तमिळनाडू दौऱ्यात शहा हे सुपरस्टार रजनीकांत यांची भेट घेण्याची शक्यता आहे. रजनीकांत हे राजकारणात प्रवेश करणार ही चर्चा अनेक वर्षांपासून सुरू असली तरी पुढील विधानसभा निवडणुकीत ती प्रत्यक्षात येऊ शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. यामुळे शहा आणि रजनीकांत यांची भेट अतिशय महत्वाची ठरणार आहे. 

रजनीकांत यांची भेट शहा घेणार का, या प्रश्नावर भाजप नेत्यांनी थेट उत्तर देणे टाळले आहे. अमित शहा हे रजनीकांत यांची भेट घेणार नाहीत, असे मी म्हणणार नाही, असे गोलगोल उत्तर भाजपचे राज्य सरचिटणीस के.टी.राघवन यांनी दिले. 

शहा हे या दौऱ्यात माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांचे पुत्र एम. अळगिरी यांच्याशी चर्चा करणार आहेत. एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकमधून अळगिरी यांना  बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ते लवकरच नव्या पक्षाची स्थापना करणार आहेत. त्यांच्या या पक्षाशी युती करण्याच्या दृष्टीने शहा-अळगिरींबरोबर चर्चा करतील, असे सांगण्यात येते.  

अळगिरी यांच्याशी युती झाली तर भाजपला त्याचा कितपत फायदा होईल, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, द्रमुकला याचा नक्कीच फटका बसेल. द्रमुकला फटका बसल्यास याचा थेट फायदा अण्णाद्रमुकला होईल. याचबरोबर भाजपच्याही मतटक्‍क्‍यातही काहीशी वाढ होऊ शकेल. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख