मोठी बातमी : कंगना प्रकरणी संजय राऊत अडचणीत; वादग्रस्त वक्तव्ये भोवणार - bjp it cell demands fir against shivsena leader and mp sanjay raut | Politics Marathi News - Sarkarnama

मोठी बातमी : कंगना प्रकरणी संजय राऊत अडचणीत; वादग्रस्त वक्तव्ये भोवणार

वृत्तसंस्था
रविवार, 13 सप्टेंबर 2020

अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सुरू झालेला वाद अद्याप शमलेला नाही. या वादाला आता शिवसेना विरुद्ध भाजप असे स्वरुप आले आहे. 

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वादग्रस्त वक्तव्यावरुन सुरू झालेला गदारोळ अद्याप संपलेला नाही. कंगना आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात रोज जोरदार सामना रंगत असल्याचे चित्र आहे. कंगनाच्या बाजूने भाजप नेते पुढे सरसावले आहेत. आता भाजपचा आयटी सेलही मैदानात उतरला आहे. आयटी सेलने संजय राऊत यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली असून, यामुळे राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

कंगनाने मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेने तिला मुंबईत पाय ठेवू देणार नाही, अशा इशारा दिला होता. कंगनाविरोधात महाराष्ट्रात वातावरण तापले असल्याने केंद्रातील मोदी सरकारने तिला 'वाय' सुरक्षा दिली आहे. मुंबई महापालिकेच्या पथकाने कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडून टाकले होते. यावर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांना लक्ष्य केले होते. 

कंगनाच्या बंगल्याचा भाग पाडल्यानंतर संतापून तिने ट्विटरवर मुंबई महापालिकेच्या विरोधात मोर्चा उघडला होता. तिने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी केलेली तुलना योग्य असल्याचा दावा केला होता. तिने म्हटले होते की, ही इमारत माझ्यासाठी राम मंदिराप्रमाणे होती. आज तेथे बाबर आला आहे. आज पुन्हा इतिहास घडत असून, मंदिर पाडले जात आहे. परंतु, लक्षात ठेवा मंदिर पुन्हा बनेल. जय श्री राम! 

संजय राऊत यांना कंगना प्रकरणात राज्यातील भाजप नेते लक्ष्य करीत आहेत. आता भाजपचा आयटी सेलही यात उतरला आहे. आयटी सेलचे नेते चेतन ब्रगता आणि हिमाचल प्रदेशच्या भाजप सरचिटणीस पायल वडिया यांनी राऊत यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. भारतीय दंड विधान (आयपीसी) कलम 294 आणि 509 अंतर्गत राऊतांवर तक्रार दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राऊत यांनी असंसदीय आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर करुन कंगनाचा अपमान केला. तसेच, देशातील कायद्याला ते जुमानत नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. ही तक्रार शिमल्याच्या पोलीस अधिक्षकांना देण्यात आली आहे. हिमाचलमधील भाजप सरकारने आधीच राऊत यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली आहे. यामुळे राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख