फडणवीस प्रभारी असलेल्या राज्यात भाजपला बालेकिल्ल्यातच उमेदवार मिळेना!

गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) तोंडावर भाजपची (BJP) डोकेदुखी वाढू लागली आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) तोंडावर भाजपच्या (BJP) अडचणी वाढल्या आहेत. भाजप नेते व विधानसभा अध्यक्ष राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांनी ऐनवेळी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. पाटणेकर यांच्या जागी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या डिचोली मतदारसंघातून लढण्यासाठी दोन नेत्यांनी थेट नकार दिल्याने उमेदवार शोधण्यासाठी भाजपला धावाधाव करावी लागत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. गोव्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आहे. पाटणेकर यांनी निवडणुकीत उभे न राहण्यासाठी प्रकृतीचे कारण पुढे केले आहे. विधानसभा अध्यक्षांनीच निवडणूक लढण्यास नकार दिल्याने भाजपवर नामुष्की ओढवली आहे.

पाटणेकर यांनी 2002 पासून तीन वेळा डिचोली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी 2012 मध्ये भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचा पराभव झाला होता. पाटणेकर यांनी विधानसभा निवडणूक लढण्यास नकार दिल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपचे सरचिटणीस सतीश धोंड यांनी दुसरा उमेदवार शोधण्यास सुरवात केली आहे. गोव्यात विधानसभेसाठी 14 फेब्रुवारीला मतदान होत आहे तर निकाल 10 मार्चला लागणार आहे. मुख्यमंत्री सावंत आणि धोंड यांनी डिचोलीमधून लढण्यासाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते नरेश सावळ यांना गळ घातली होती. परंतु, त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले की, माझी प्रतिमा खराब करायची नसल्याने मी भाजपची ऑफर नाकारली आहे. मी कायम डिचोलीच्या लोकांसोबत आहे.

Devendra Fadnavis
भाजपला मोठा धक्का! विधानसभा अध्यक्षांची ऐनवेळी निवडणुकीतून माघार

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंदशेट तानवडे यांनी अपक्ष उमेदवार डॉ.चंद्रकांत शेट्ये यांना आग्रह केला आहे. परंतु, शेट्ये यांनीही डिचोलीतून भाजपकडून लढण्यास नकार दिला आहे. समर्थकांशी चर्चा करून भाजपची ऑफर त्यांनी नाकारली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी भाजपला नकार दिला आहे. मी माझ्या समर्थकांसोबत नैतिकतेचे राजकारण करीत आहे. मतदारसंघातील दुर्लक्षित आणि गरीब जनतेच्या विकासासाठी मी काम करीत राहीन.

Devendra Fadnavis
मोठी बातमी : अनिल देशमुखांना न्यायालयाचा दणका

राज्यात भाजपला गळती लागल्याचे चित्र असून, आतापर्यंत 4 आमदारांनी पक्ष सोडला आहे. मंत्री मायकल लोबो यांनी मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याचबरोबर प्रवीण झांटे यांनीही आमदारकीची राजीनामा दिला आहे. प्रवीण झांटे हे राज्यातील मोठे उद्योगपती आहेत. अलिना सलडान्हा यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन आम आदमी पक्षात प्रवेश करत उमेदवारीही मिळवली आहे. त्यांच्यानंतर कार्लोस अल्मेडा या भाजप आमदाराने राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com