स्टॅलिनपुत्राची उमेदवारी धोक्यात? भाजपची निवडणूक आयोगाकडे धाव

तमिळनाडूत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. आता तेथे वेगळेच नाट्य रंगले आहे.
bjp filed complaint against dmk leader udayanidhi stalin
bjp filed complaint against dmk leader udayanidhi stalin

नवी दिल्ली : तमिळनाडूत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. यात आता द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी हे अडचणीत आले आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्याला आक्षेप घेत भाजपने थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. उदयनिधींची उमेदवारी रद्द करण्याची मागणी भाजपने केली आहे.   

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या छळामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू झाल्याचे वक्तव्य उदयनिधी यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना डावलले जात, असल्याच्या मोदींच्या टिकेला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले. उदयनिधी एका सभेमध्ये बोलत होते. 

उदयनिधी यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत भाजपने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. भाजपने आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. उदयनिधी यांची उमेदवारी रद्द करावी आणि त्यांना द्रमुकच्या स्टार प्रचारकांमधून वगळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.  

उदयनिधी काय म्हणाले होते? 
पंतप्रधान मोदींवर टीका करताना उदयनिधी म्हणाले होते की, सुषमा स्वराज नावाची एक व्यक्ती होती. मोदींनी टाकलेल्या दबावामुळेच त्यांचा मृत्यू झाला. अरुण जेटली नावाचीही एक व्यक्ती होती. मोदींनी केलेल्या छळामुळेच त्यांचा मृत्यू झाला. पंतप्रधान पक्षातील वेंकय्या नायडूंसारख्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत आहेत. तुम्ही सर्वांनाच बाजूला केले. मिस्टर मोदी, मी पलानीस्वामी नाही जो तुम्हाला घाबरेल आणि तुमच्यासमोर झुकेल. मी उदयनिधी स्टॅलिन आहे.

बासुरी स्वराज काय म्हणाल्या? 
सुषमा स्वराज यांची मुलगी बासुरी स्वराज यांनी उदयनिधी यांनी आपल्या आईच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करु नये, असे म्हटले आहे. त्यांनी ट्विटवर म्हटले आहे की, उदयनिधीजी कृपया माझ्या आईच्या आठवणींचा वापर तुमच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी करु नका. तुमचे वक्तव्य चुकीचे आहे. मोदींनी माझ्या आईला नेहमी आदर आणि सन्मान दिला. आमच्या कठीण काळात पंतप्रधान आणि पक्ष आमच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले. तुमच्या वक्तव्याने आम्ही दुखावलो आहोत. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना बासुरी स्वराज म्हणाल्या, राजकीय मुद्द्यांवर निवडणूक लढायची सोडून उदयनिधीजी माझ्या आई आणि अरुण जेटलींच्या नावाचा वापर करत पंतप्रधानांवर हल्ला करत आहेत याचे आश्चर्य वाटते. 

अरुण जेटलींच्या मुलीची प्रतिक्रिया
अरुण जेटली यांची मुलगी सोनाली जेटली यांनीही ट्विटरच्या माध्यमातून उदयनिधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, उदयनिधीजी तुमच्यावर निवडणुकीचा दबाव आहे हे मी समजू शकते. पण तुम्ही माझ्या वडिलांच्या आठवणींचा अनादर करणार असाल तर शांत बसणार नाही. नरेंद्र मोदी आणि अरुण जेटलींमध्ये राजकारणापलीकडचे संबंध होते. ही मैत्री तुम्हाला कळावी अशी प्रार्थना करते. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com