पाटणा : बिहारच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा नितीशकुमार हेच राहिले तरी भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले नव्हते. यामुळे नाराज असलेल्या मोदींना अखेर भाजपने राज्यसभा उमेदवारी देऊन त्यांचे पुर्नवसन केले आहे. मात्र, या पुनर्वसनाची मोठी किंमत लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांना मोजावी लागणार आहे.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस, डावे यांची महाआघाडी असे चित्र होते. एनडीने 125 जागा मिळवत स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला. याचवेळी महाआघाडीने 110 जागा मिळवल्या होत्या.
भाजपा की केन्द्रीय चुनाव समिति ने बिहार में होने वाले आगामी राज्य सभा उप-चुनाव के लिए श्री @SushilModi के नाम पर अपनी स्वीकृति प्रदान की। pic.twitter.com/Ue7LBDFMC1
— BJP (@BJP4India) November 27, 2020
राज्यात राष्ट्रीय जनता दल 75 जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. दुसऱ्या क्रमांकावर 74 जागांसह भाजप होता. जेडीयूला 43 जागा मिळाल्या असून, काँग्रेसला 19 जागा आहेत. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. नितीश यांच्या जेडीयूला कमी जागा मिळाल्याने ते पुन्हा मुख्यमंत्री होणार का अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर भाजपने नितीशकुमार यांचेच नाव पुढे केले होते.
भाजपने उपमुख्यमंत्रिपदी तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांची निवड केली होती. सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्री देण्यात आले नव्हते. याबद्दल मोदी यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. त्यांनी ट्विटरवर म्हटले होते आहे की, भाजप आणि संघ परिवाराने माझ्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दित दुसऱ्या कोणाकडून मिळणार नाही एवढे दान दिले आहे. यापुढेही पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती पार पाडू. माझे कार्यकर्ता पद तर कोणी काढून घेऊ शकत नाही.
याचवेळी चिराग पासवान यांनी राज्यात एनडीएशी फारकत घेत राष्ट्रीय पातळीवर भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली होती. त्यांनी नितीशकुमार यांच्या जेडीयूच्या काही जागा कमी करण्यात यश मिळवले होते. पासवान हे सतत नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक करीत होते. त्यांची भाजपशी छुपी युती असल्याचीही चर्चा होती. मात्र, निवडणूक संपल्यानंतर भाजपने पासवान यांचा मोठा झटका दिला आहे.
लोक जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा रामविलास पासवान यांच्या निधनानंतर बिहारमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना निवडणूक आयोगाने काढली आहे. या जागेवर भाजपने सुशीलकुमार मोदींना त्यांचा उमेदवारी दिली आहे. भाजपने एकाच वेळी मोदींचे पुनर्वसन आणि चिराग पासवान यांना झटका देण्याची चाल खेळली आहे. यामुळे पासवान यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार, अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत 3 डिसेंबर आहे. या जागेसाठी 14 डिसेंबरला मतदान असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.
Edited by Sanjay Jadhav

