स्टार प्रचारकांमधून रुडी अन् शाहनवाज गायब...भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर - bjp excludes rajiv pratap rudy and shahnawaz hussain from star campaigners | Politics Marathi News - Sarkarnama

स्टार प्रचारकांमधून रुडी अन् शाहनवाज गायब...भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर

मंगेश वैशंपायन
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपने बिहारमध्ये प्रचारासाठी 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, यावरुन वाद निर्माण झाला आहे. 

नवी दिल्ली : बिहार  विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, यात पंतपप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह 30 नेत्यांचा समावेश आहे. मात्र, या यादीतून गेली अनेक वर्षे पक्षाचा चेहरा असलेले खासदार राजीव प्रताप रूडी व शाहनवाज हुसेन यांची नावे गायब झाली आहेत. मूळचे बिहारमधील असलेले आणि राष्ट्रीय स्तरावर छाप पाडणाऱ्या नेत्यांनाच भाजपने डावलल्याने पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. 

बिहारच्या कोणत्याही निवडणुकीत भाजप प्रचारकांच्या यादी इतर नेत्यांची नावे बदलत मात्र,  रुडी आणि शाहनवाज यांची नावे कायम असत. गेल्या तीन-साडेतीन दशकांत पहिल्यांदाच या दोघांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळली गेली आहेत. रूडी यांनी याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर हा मुद्दा चव्हाट्यावर आला. शाहनवाज यांना पक्षनेतृत्वाने बाजूला करुन वेगळा संदेश दिला आहे. वाजपेयी-अडवानी काळापासून भाजपबरोबर असलेले रूडी व शाहनवाज सध्या भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. 

बिहार भाजपकडून ज्या नेत्यांच्या नावांचे प्रस्ताव आले होते, त्यांचाच यादीत समावेश आहे. हे खरे असेल तर सलग दूरदर्शनवर दिसणारे शाहनवाज व छपरातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले रूडी यांची गरज राज्य भाजप नेत्यांनाच वाटत नाही का, असा प्रश्नही उपस्थित होते आहे. एका भाजप नेत्याने या दोघांचीही नावे स्टार प्रचारकांत नसण्याने इतकी चर्चा होऊ नये, अशी भूमिका घेतली.  

शाहनवाज यांना 2014 पूर्वी भाजपचा मुस्लिम चेहरा म्हटले जायचे. सिकंदर बख्त, मुख्तार अब्बास नक्वी व शाहनवाज असे निवडक मुस्लिम नेतेच भाजपमध्ये दीर्घकाळ राहिले आहेत. मात्र, सैय्यद जफर इस्लाम यांच्यासारखे नवे चेहरे आल्यावर आता शाहनवाज यांची पूर्वीइतकी गरज पक्षाला वाटेनाशी झाल्याचे सांगण्यात येते.

या निवडणुकीत शाहनवाज यांना भागलपूरमधून तिकिटाबाबत विचारणा करण्यात आली होती. त्या प्रस्तावाबाबत त्यांनी उदासीनता दाखविल्यावर सर्वेसर्वा नेतृत्वाने त्यांना आणखी बाजूला केल्याचे सांगितले जाते. शाहनवाज यांनी आपल्याला पक्षाचा हा निर्णय मान्य आहे, अशी त्रोटक प्रतीक्रिया दिली आहे. मात्र आपण अटलजींच्या नवरत्नांपैकी एक आहोत, अशी आठवणही त्यानी करुन दिली आहे.

रुडी यांनी 1996 पासून व वयाच्या 25 व्या वर्षापासून भाजपकडून अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. रूडी सध्या दुसऱ्यांदा खासदार आहेत. मात्र 2019 मध्ये त्यांना केंद्रीय मंत्रिपदाचीही संधी नाकरण्यात आली. शाहनवाज यांच्यापेक्षा बिहारच्या मुस्लिम मतदारांसाठी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचाच करिष्मा पुरेसा असल्याचेही भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख