राजकारणाच्या खेळात गुप्तेश्वर पांडेंवर भारी पडला सहाय्यक फौजदार - bjp denies ticket to ex dgp gupetshwar pandey and gave it to ex asi | Politics Marathi News - Sarkarnama

राजकारणाच्या खेळात गुप्तेश्वर पांडेंवर भारी पडला सहाय्यक फौजदार

वृत्तसंस्था
शनिवार, 10 ऑक्टोबर 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आक्रमक भूमिका घेणारे तत्कालीन पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्या पदरी अखेर निराशाच पडली आहे. 

नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आक्रमक भूमिका घेणारे बिहारचे तत्कालीन पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी संयुक्त जनता दलात (जेडीयू) प्रवेश केला होता. पांडे हे मूळचे बक्सर भागातील असल्याने त्यांना तेथून उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र, तेथील दोन्ही मतदारसंघ जागा वाटपात भाजपकडे गेल्याने जेडीयूने त्यांना तिकिट नाकारले. भाजपनेही पांडे यांना तिकिट नाकारुन एका माजी सहाय्यक फौजदाराला बक्सरमधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माजी पोलीस महासंचालकांवर माजी सहाय्यक फौजदार भारी पडल्याचे चित्र आहे. 

सुशांत मृत्यू प्रकरणात बिहारचे तत्कालीन पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर गुप्तेश्वर पांडे यांनी अचानक स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली होती. त्यांचा अर्ज तातडीने राज्य सरकारने मंजूर केला होता. मुख्यंत्री नितीशकुमार यांच्या उपस्थितीत त्यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला होता. नितीशकुमार यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला होता. सुशांत प्रकरणी त्यांनी घेतलेली भूमिका अखेर त्यांच्यासाठी लाभदायी ठरल्याचे चित्र होते.   

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  गुप्तेश्वर पांडे हे मूळचे बक्सरमधील आहेत. त्यामुळे त्यांना बक्सर भागातील बक्सर आणि ब्रह्मपूर या मतदारसंघांतून उमेदवारी मिळेल, अशी आशा होती. मात्र, हे दोन्ही मतदारसंघ जागा वाटपात भाजपकडे गेले आहेत. यामुळे पांडे यांचे तिकिट कापले गेले. त्यानंतर पांडे हे भाजपकडून तिकिट मिळवण्यासाठी पाटण्यापासून दिल्लीपर्यंत हेलपाटे मारत होते. या दोनपैकी एका मतदारसंघातून तिकिट मिळवण्याचा आटापिटा पांडे यांच्याकडून सुरू होता. मात्र, भाजपनेही त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. 

भाजपने बक्सरमधून माजी सहाय्यक फौजदार परशुराम चतुर्वेदी यांना तिकिट दिले आहे. पांडे आणि चतुर्वेदी यांच्यात अनेक साम्यस्थळे आहेत. दोघेही बिहार पोलीस दलात होते. पांडे हे पोलीस महासंचालक तर चतुर्वेदी हे सहाय्यक फौजदार होते. दोघांनी राजकीय कारकिर्द सुरू करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. दोघेही बक्सर जिल्ह्यातील असून, दोघेही एकाच जातीचे आहेत. 

पांडे यांनी जेडीयूच्या बक्सर जिल्हा प्रमुखांची गुप्त भेट घेतली होती. त्यामुळे पांडे हे बक्सरमधून उभे राहणार अशी जोरदार चर्चा मतदारसंघात सुरू झाली होती. चतुर्वेदी हे बक्सरमधील माहदा गावातील आहेत. पांडे यांनी हालचाली सुरू केल्यानंतर चतुर्वेदी यांनीही जोरदार हालचाली सुरू केल्या. त्यांनी तिकिटासाठी लॉबिंग सुरू केले. मागील वेळी बक्सरमधून भाजपला पराभूत करुन काँग्रेसने हा मतदारसंघ ताब्यात मिळवला होता. 

चतुर्वेदी हे मागील दोन दशके भाजपशी निगडित आहेत. त्यांनी 2004-05 मध्ये पोलीस दलातून स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकीय वाटचाल सुरू केली होती. पक्षाच्या शेतकरी सेलच्या कार्यकारी समितीत त्यांचा समावेश करण्यात आला होता. नंतर राज्य कार्यकारी समितीतही त्यांना स्थान देण्यात आले होते. अखेर पक्षाने त्यांना बक्सरमधून तिकिट देत त्यांच्या पक्ष कार्याची दखल घेतली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख