उत्तर प्रदेश बनला आता राज्यपाल प्रदेश..! - bjp choose more governors from uttar pradesh than any other state | Politics Marathi News - Sarkarnama

उत्तर प्रदेश बनला आता राज्यपाल प्रदेश..!

मंगेश वैशंपायन
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

उत्तर प्रदेश हे देशातील सर्वांत मोठे राज्य आहे. देशातील राजकीय समीकरणे उत्तर प्रदेशवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. आता उत्तर प्रदेशची आणखी एक वेगळी ओळख निर्माण होऊ लागली आहे.  

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशची ओळख ही लोकसभेतील सत्तेची चावी अशी कायम राहिली आहे. देशातील राजकीय समीकरणे या देशातील सर्वांत मोठ्या राज्यावर अवलंबून असतात.  आता उत्तर प्रदेशची एक नवी ओळख बनू लागली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशातील ज्येष्ठ भाजप नेत्यांना सर्वाधिक संधी मिळत आहे. उत्तर प्रदेशमधील आठ नेते सध्या राज्यपाल आहेत. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेसुद्धा उत्तर प्रदेशमधीलच आहेत.

देशाच्या सत्तेचा मार्ग सर्वाधिक 80 खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेशातून जातो. पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांच्यापासून अटलबिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत सर्वाधिक पंतप्रधानही उत्तर प्रदेशने दिले आहेत. भाजपचा राज्यसभेतील बहुमताची समीकरणेही राज्यावर अवलंबून आहेत. याचबरोबर आता राज्यपाल देणारे राज्य अशीही या नवी ओळख बनू लागली आहे. 

जम्मू काश्‍मीरच्या राज्यपालपदी मनोज सिन्हा यांची निवड झाली आहे. सिन्हा हे बनारस विद्यापीठात सुरूवातीला अभाविप नेते होते. त्यांची राजकीय कारकीर्द वाराणसीला लागून असलेल्या गाझीपूरमध्ये सुरू झाली. जम्मू काश्‍मीरचे माजी राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांची मोदी सरकारने महालेखापाल (कॅग) म्हणून केल्यावर सिन्हा यांना तेथे पाठविण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक ज्येष्ठ भाजप नेते राज्यपाल म्हणून सध्या विविध राज्यांत कार्यरत आहेत. 

राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याणसिंह हे तर रामजन्मभूमीच्या ऐन आंदोलन काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीच होते. त्यांच्याशिवाय दिवंगत लालजी टंडन व पश्‍चिम बंगालचे माजी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी हेही उत्तर प्रदेशचे होते. गुजरातचे राज्यपाल ओ.पी. कोहली यांची हयात दिल्लीत गेली. ते 1999 ते 2000मध्ये दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्षही होते. मात्र, तेही मूळचे नोएडातील रहिवासी आहेत. 

उत्तर प्रदेशमधून आलेले राज्यपाल : 
जम्मू-काश्‍मीर- मनोज सिन्हा 
उत्तराखंड - बेबीरानी मौर्य  
राजस्थान- कलराज मिश्र 
गोवा - सत्यपाल मलिक 
बिहार - फागू चौहान 
अरुणाचल प्रदेश- ब्रिगेडियर बी.डी. मिश्रा 
केरळ - आरीफ महम्मद खान 
गुजरात- ओ.पी. कोहली 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख